मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । आग्रा येथील 6 जणांना दिल्लीतील कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आल्याने विषाणूची बाधा झाली असून ते पॉझिटिव्ह असल्याचे सिद्ध झाले आहे. सोमवारी नवी दिल्ली, तेलंगणात प्रत्येकी एक असे दोन पॉझिटिव्ह आढळले. मंगळवारी आग्रा येथील 6 जण पॉझिटिव्ह आढळून आले. मंगळवारीच जयपूर येथे आलेल्या इटालियन दाम्पत्याचा अहवालही पॉझिटिव्ह आल्याने गेल्या 48 तासांत देशातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 10 झाली आहे. देशात आजअखेर कोरोनाबाधितांची संख्या 13 वर पोहोचली आहे.
सुरुवातीला केरळमध्ये तीन कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. मात्र उपचारांनंतर हे तिघेही निगेटिव्ह होऊन बरे झाले.दरम्यान, खबरदारी म्हणून मंगळवारी ब्रिटिश एअरवेजची 216 उड्डाणे रद्द करण्यात आली.
उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री जयप्रताप सिंह यांनी सांगितले की, ‘राज्यात आढळलेल्या या सहा रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
ते म्हणाले, आम्ही विमानतळांवर तसेच नेपाळ सीमेलगतच्या मार्गांवरही नजर ठेवून आहोत. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. दरम्यान, आरोग्याधिकारी स्वत:, रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील लोकांवर लक्ष ठेवून आहेत, जेणेकरून संक्रमणात वाढ होऊ नये.
याआधी जयपूरमध्ये इटलीतील 69 वर्षीय अँड्री कार्ली या गृहस्थाला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. ते चार दिवसांपासून एसएमएस रुग्णालयात दाखल आहेत. रुग्णालय प्रशासन दिल्लीतील इटलीच्या दूतावासाच्या संपर्कात आहे. कारण कार्ली यांच्यासह इटलीतील 18 लोक प्रवासाला होते. सोमवारीच कार्ली हे कोरोनाग्रस्त असल्याची बाब समोर आली होती. कार्ली यांचे नमुने पुणे येथील विषाणू संशोधन संस्थेत पाठविण्यात आले होते. यानंतर एसएमएस रुग्णालयाच्या सर्व कर्मचार्यांच्या सुट्ट्या पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. कार्ली यांच्या पत्नीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. तेलंगणा आणि दिल्लीत सोमवारी प्रत्येकी एक बाधित आढळून आला होता. दोघांवर उपचार सुरू आहेत. त्याआधी केरळात तीन बाधित आढळले होते. तिघे बरे झाले आहेत. बाधितासह ज्या 25 जणांनी प्रवास केला होता, त्यांचीही तपासणी करण्यात आली आहे.
कोरोनाच्या तपासणीपासून ते उपचारापर्यंत सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे. कुणीही घाबरण्याचे कारण नाही. कोरोनाबाबत कृपया अफवा पसरवू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोनासंदर्भात पंतप्रधान मोदी यांची मंगळवारी भेट घेतली. आजाराच्या प्रतिबंधासाठी केलेल्या आणि करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा झाली.
दिल्लीतील हयात हॉटेलमधील ‘ला पिझ्झा रेस्टॉरंट’मध्ये 28 फेब्रुवारी रोजी जेवण करायला गेलेल्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हॉटेल व्यवस्थापनाने म्हटले आहे की, संक्रमित व्यक्तीने रेस्टॉरंटमध्ये जेवण केले तेव्हा जे जे कर्मचारी हजर होते, त्यांना 14 दिवसांपर्यंत अन्य लोकांपासून वेगळे राहण्यास सांगण्यात आले आहे. रेस्टॉरंटकडून कर्मचार्यांच्या संपर्कात येणार्या सर्वांचेच तापमान दररोज तपासण्याची व्यवस्था रेस्टॉरंटकडून करण्यात आली आहे.
चीनच्या नागरिकांचा 5 फेब्रुवारी किंवा त्यापूर्वी जारी करण्यात आलेला व्हिसा रद्द झालेला आहे. ज्या परदेशी नागरिकांनी चीन, इराण, इटली, दक्षिण कोरिया किंवा जपानचा प्रवास 1 फेब्रुवारी किंवा त्यानंतर केलेला असेल, त्यांचाही व्हिसा रद्द करण्यात आला आहे.
नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम, मलेशिया, चीन, हाँगकाँग, थायलंड, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि जपान या देशांतून भारतात दाखल होणार्या प्रवाशांची 21 विमानतळांवर वैद्यकीय चाचणी सुरू आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज