टीम मंगळवेढा टाईम्स।
पत्नीला माण नदीच्या पात्रात बंधाऱ्यातील पाण्यात ढकलून देऊन तिचा खून करून अपघात झाल्याचा बनाव केल्याप्रकरणी पती हनुमंत दादासो खांडेकर (रा.देवळे,ता.सांगोला) यास दोषी धरून पंढरपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश के.व्ही.बोरा यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावून १० हजार रुपयांचा दंड केला.
देवळे येथील आरोपी हनुमंत खांडेकर याने पत्नी शुभांगी हिस मूल होत नसल्याने दोघांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यास औषधोपचार करण्याची गरज होती.
त्याने त्याच्या उपचाराकरिता पत्नी शुभांगी हिस माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावला होता.
परंतु सासरच्या लोकांनी पैसे दिले नाहीत याचा राग मनात धरून व विनाकारण चिडचिड करून तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन ८ डिसेंबर २०१९ रोजी रात्री ८ ते ८:३० च्या दरम्यान पत्नी शुभांगी हिचे माहेरुन खळवे (ता.माळशिरस) येथून घरी देवळे घरी येताना तिला माण नदीच्या पात्रात ढकलून देऊन तिचा खून केला व अपघात झाल्याचा बनाव केला.
याप्रकरणी मयत शुभांगीची आई राणी तानाजी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पती हनुमंत खांडेकर याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांनी करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. पंढरपूर येथील सत्र न्यायालयात खटल्याच्या सुनावणी वेळी सरकार पक्षातर्फे १८ साक्षीदारामध्ये फिर्यादी राणी पाटील, पंच, साक्षीदार, मयताचे वडील तानाजी पाटील, चुलते इरकर, शहाजी पाटील, डॉ.सतीष जोशी, डॉ.पूजा साळे,
डॉ.आशिष भुतडा, पोलीस कॉन्स्टेबल धनंजय संभाजी शिंदे, अंकुश चव्हाण व तपासी अधिकारी प्रशांत हुले यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.
सरकार पक्षाचा झालेला पुरावा, आरोपी पक्षाचा बचाव इतर बाबीचे अवलोकन करून न्यायाधीश के.व्ही. बोरा यांनी आरोपी पती हनुमंत खांडेकर या जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

तसेच १० हजार रुपयांचा दंड केला. या केसमध्ये सरकार पक्षातर्फे अॅड सारंग वांगीकर यांनी कामकाज पाहिले . कोर्ट पैरवी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल राजू माने यांनी मदत केली.
या मुद्द्यावरून न्यायालयाचा निर्णय
पत्नीला वाचविण्याचा काय प्रयत्न केला तसेच घटनेपूर्वी तिचे दागिने काढून घेणे घटनेनंतर अपघाताचा बनाव करणे या सगळ्या गोष्टीबाबत आरोपीने स्पष्टीकरण दिलेले नाही.
कोणतेही जखम नसताना स्वतःहून सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होऊन बेशुद्ध असल्याचा बनाव करणे या सर्व गोष्टी विचार करण्याजोगा आहेत.

सरकार पक्षातर्फे आरोपी विरुद्ध दाखल असलेला गुन्हा सर्व संशयाच्या पलीकडे जाऊन सिध्द केलेला आहे असा युक्तिवाद करण्यात आला. त्याकरिता वरिष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडे दाखल करण्यात आला.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












