टीम मंगळवेढा टाईम्स ।
दि.२३ नोव्हेंबर रोजी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजी आ. कर्मवीर औदुंबरअण्णा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विठ्ठलचे संचालक युवराज पाटील यांनी विठ्ठल हॉस्पिटल येथे शेतकरी, सभासद आणि कार्यकर्ते यांचा मेळावा बोलावला आहे.
या मेळाव्यात काय चर्चा होणार आणि निर्णय काय निघणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
पंढरपूर तालुक्यातील मोठी राजकीय शक्ती असलेला विठ्ठल परिवार आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर तसेच विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर सैरभैर झालेला आहे.
त्यातच भालके-काळे आणि पाटील यांच्यात परिवाराची विभागणी झाल्यामुळे आगामी काळात विठ्ठल परिवार एकसंघ उभा राहणार का ? याला उभारी नेमकी कोण देणार याकडे आता तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पंढरपूर तालुक्यात राजकीय पक्ष गौण तर स्थानिक नेत्यांचे गट मजबूत आहेत . आ.प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखालील पांडुरंग परिवार अतिशय मजबुतीने उभा राहिलेला आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा पोटनिवडणुकीत काढला आणि पांडुरंग सहकारी साखर
कारखान्याची निवडणूक बिनविरोध करून कारखाना जिल्ह्यात एक नंबरवर चालवून परिचारकांनी आगामी नगरपालिका आणि जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणुकीसाठी जोरदार मशागत करून ठेवली आहे.
याउलट प्रमुख विरोधी गट असलेल्या विठ्ठल परिवारात नेतृत्वाच्या एकसंघतेचा अभाव आहे.
दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर विठ्ठल परिवारात लाथाळ्या सुरू झाल्या आहेत परिवारातील महत्वाची संस्था असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुरू होऊ शकलेला नाही त्यावरूनही अंतर्गत कुरघोड्या आणि आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
विठ्ठल परिवारातील वयाने जेष्ठ असलेले कल्याणराव काळे यांनी ही धुसफूस आणि परिवाराची अधोगती रोखण्यासाठी अद्याप तरी काही प्रयत्न केलेले दिसत नाहीत.
त्यांनी कसलाही पुढाकार घेतलेला नाही तर भगीरथ भालके , युवराज पाटील , अॅड . दीपक पवार , अॅड . गणेश पाटील या तरुण नेत्यांमध्ये मोठ्या या प्रमाणात लाथाळ्या सुरू असल्याने कुणाचा पायपोस कुणाला नाही.
पार्श्वभूमीवर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे काय होणार , आगामी नगरपालिका , जिल्हा परिषद , पंचायत स निवडणुकीत कसे लढणार हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत . समोर परिचारक यांचा सारखा बलाढ्य प्रतिस्पर्धी असताना विठ्ठल परिवार गोंधळलेल्या अवस्थेत आहे.
या अवस्थेतून परिवाराला उभारी कोण देणार, विठ्ठल कारखाना सुरू होणार का, तरुण नेत्यांमधील कुरघोड्या कोण थांबवणार, असे अनेक प्रश्न विठ्ठल परिवाराच्या कार्यकर्त्यांसमोर उभा आहेत. (स्रोत:दिव्य मराठी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज