टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी येथील विशाल फटे फसवणूक प्रकरण ताजे असतानाच आणखी एक सायबर क्राईमच्या घटनेत सोलापूरकरांना कोट्यवधींना चुना लावल्याचे पुढे आली आहे.
विशेष म्हणजे याही घटने सोलापूकर जादा परताव्याच्या आमिषाला बळी पडले आहेत. क्लाऊड मायनर ॲपवरील ‘सीसीएच’मध्ये ‘दोन लाख रुपये गुंतवा आणि सात दिवसांत ४४ लाख रुपये कमवा’ अशी स्कीम होती. सुरुवातीला चांगला परतावा मिळाल्याने हजारो सोलापूरकर त्या बळी पडले आहेत.
दरम्यान, क्लाऊड मायनर ॲपवरील विथड्रॉल बंद झाले असून या स्कीमचे एजंटही पसार झाले आहेत. त्यामुळे फसवणूक झालेल्या नागरिकांनी सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे.
आतापर्यंत जवळपास ५० जणांची जवळपास ३५ ते ४० लाखांची फसवणूक झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पण, फसवणूक झालेल्यांची संख्या पाच हजारांहून अधिक असून फसवणुकीचा आकडा तीनशे ते चारशे कोटींपर्यंत जाईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
साधारण वर्षभरापूर्वीच बार्शीत जादा परताव्याच्या आमिषाने विशाल फटे या तरुणाने शेकडो जणांची फसवणूक केली होती. ते प्रकरण ताजे असतानाच आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे सोलापूरकरांची फसवणूक झाल्याचे पुढे आले आहे.
सोलापूर शहरात मटका, जुगार खेळणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. दुसरीकडे एकमेकांच्या संपर्कातून ऑनलाइन ॲप किंवा ऑफलाइन स्किमला अनेकदा सोलापूकरांना कोट्यवधींचा गंडा बसला आहे.
सायबर गुन्हेगारांकडून सातत्याने वेगवेगळे अमिष दाखविले जात आहे. त्याला बळी पडू नका, असे सांगूनही लोक विशेषत: नोकदार, व्यावसायिक सुध्दा त्याला बळी पडले आहेत.
सव्वादोन लाख रुपये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या कमी होती. त्यामुळे ‘सीसीएच’ ॲपने नवीन स्किम काढून लोकांना ३५ हजार गुंतवा आणि दररोज तीन हजार रुपये मिळतील, असे अमिष दाखवले.
एकमेकांच्या संपर्कातून अनेकांनी एजंटामार्फत पैसे गुंतवले. पण, ६ ते ८ ऑक्टोबर रोजी मोठी रक्कम जमा होताच, या ॲप चालकाने आपला गाशा गुंडळाला.
गुंतवणूकदार आक्रमक झाल्याने ॲपमध्ये पैसे गुंतवायला भाग पाडणारे एजंटांनी धूम ठोकली आहे. पोलिस आता त्यांचा शोध घेत आहेत.
कमी दिवसांत जादा पैसे मिळतील, या अमिषातून अनेकांनी त्यांच्या बहिणीकडून, नातलगांकडून उसने पैसे आणले. काहींनी घरातील सोने गहाण ठेवले, मोडले.
काहींनी व्याजाने पैसे काढले आणि सीसीएच ॲपवर पैसे गुंतवल्याचे समोर आले आहे. ॲपचे हॅन्डलिंग इंडानेशियामध्ये झाले असावे, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. सायबर पोलिस त्यासंदर्भातील तपास करीत आहेत.
सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीच्या अनेक क्ल्युप्त्या शोधून काढल्या असून काही दिवस मोठा परतावा देण्याचे अमिष दाखवतात आणि मोठी रक्कम हाती लागल्यावर ते ॲप बंद करतात. चार मेंबर जोडायचे, त्यातून दोन टक्के कमिशन मिळते.
त्याला मनी सर्क्युलेशन म्हणतात. वारंवार आवाहन करूनही लोक अमिषाला बळी पडतात, हे विशेष, असे सोलापूर शहर सायबर गुन्हा शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शौकतअली पठाण यांनी सांगितले.(स्रोत;सरकारनामा)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज