टीम मंगळवेढा टाईम्स ।
गतवर्षीच्या हंगामात गळीतास पाठविलेल्या उसाची बिले द्यावीत , या मागणीसाठी तिसंगी येथील शेतकऱ्यांनी श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांच्या सरकोली येथील निवासस्थानासमोर उपोषण सुरू केले आहे.
कारखान्याकडे सातत्याने हेलपाटे मारून त्रस्त झालो असून दिवाळीचा सण समोर असल्याने आता बिले मिळाल्याशिवाय आंदोलन थांबविणार नाही, असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला आहे.
श्री विठ्ठल साखर कारखान्याने गतवर्षी ऊस गाळप केलेल्या अनेक शेतकऱ्यांना अद्यापही ‘ एफआरपी ‘ प्रमाणे बिले मिळालेली नाहीत.
कामगारांच्या पगारी , ऊस तोडणी वाहतूकदारांची बिलेही थकली आहेत . ही थकीत देणी अदा करावीत, यासाठी यापूर्वी कारखाना कार्यस्थळावर अनेकवेळा आंदोलने झाली आहेत.
संतप्त सभासद शेतकऱ्यांनी कारखान्याच्या कार्यालयांना कुलूपेही ठोकली होती. मात्र , त्या – त्या वेळी आश्वासने मिळाली.
प्रत्यक्षात अद्यापही बिले न मिळाल्याने शेतकरी, कामगार , ऊस वाहतूकदार हवालदिल झाले आहेत.
सध्या तालुका कार्यक्षेत्र असलेल्या इतर साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होत आहेत. बहुतांश कारखान्यांमध्ये मोळी टाकण्याचे कार्यक्रमही झाले . त्यातच दसरा झाला . दिवाळीचा सण तोंडावर आला आहे.
मात्र, ‘विठ्ठल’कडून गतवर्षीच्या हंगामातील बिले मिळत नसल्याने असंतोष वाढू लागला आहे. यातूनच शनिवारी तिसंगी येथील शेतकऱ्यांनी कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांच्या सरकोली येथील निवासस्थानासमोर उपोषण सुरू केले.
चक्क प्रवेशद्वारासमोरच झाडाखाली हे आंदोलन सुरू झाल्याने चर्चेला उधाण आले.
परमेश्वर पाटील, बापू रूपनर, ब्रह्मदेव पाटील, सीताराम पाटील, शत्रुघ्न मासाळ, बिरा पाटील , खंडू मेटकरी , नामदेव बोरकर, आशिष मेटकरी , भास्कर चंदनशिवे आदी शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
विविध शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलकांची भेट घेऊन पाठींबा व्यक्त केला.(स्रोत:पुण्यनगरी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज