कार्तिकी दशमी, एकादशी आणि द्वादशी (25 ते 27 नोव्हेंबर) असे तीन दिवस श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील मुखदर्शन बंद ठेवण्यात येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांनी दिली.
कार्तिकी यात्रेचा सोहळा यंदा कोरोनामुळे प्रतिकात्मक होणार आहे. यात्रेच्या निमित्ताने गेल्या चार दिवसांपासून मोठ्या संख्येने भाविक येथे दाखल झाले आहेत.
दि.16 नोव्हेंबर पासून शासनाच्या आदेशानुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ऑनलाइन दर्शनाचे बुकिंग करून आलेल्या भाविकांना प्रवेश देण्यात येत आहे.
सध्या दररोज दिवसभरात दोन हजार भाविकांना मुखदर्शनासाठी मंदिरात सोडण्यात येत आहे. जे भाविक ऑनलाईन दर्शन बुकिंग करू शकलेले नाहीत, त्यांना श्री संत नामदेव पायरी समोर उभे राहून बाहेरूनच दर्शन घेऊन परतावे लागत आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी दक्षता म्हणून 25 ते 27 नोव्हेंबर म्हणजेच कार्तिकी दशमी, एकादशी आणि द्वादशी असे तीन दिवस सध्या सुरू असलेली मुखदर्शन व्यवस्था बंद ठेवण्यात येणार आहे.
या तीन दिवसात भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी पंढरपूर शहर आणि लगतच्या 10 खेडे गावांमध्ये संचार बंदी असणार आहे.
दरम्यान, कार्तिकी एकादशीची श्री. विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मोजक्या लोकांच्या उपस्थितीत होणार असल्याचे शासकीय सूत्रांनी सांगितले.(source : sakal)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज