मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
विठ्ठल मंदिरातील नवनवीन वाद दररोज समोर येत आहेत. आता मंदिराचे नवीन कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या मुलाचा देवाला दुधाने अभिषेक करत असतानाच व्हिडीओ व्हायरल झाला.
त्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. याबाबतच्या बातम्या आणि व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यावर कार्यकारी अधिकारी शेळके यांनी तातडीने दिलगिरी व्यक्त केली आहे.
विठ्ठलाच्या प्रक्षाळ पूजेच्यावेळी कार्यकारी अधिकारी शेळके यांच्याकडून रुक्मिणीची पूजा तर मंदिर सदस्य संभाजी शिंदे यांच्याकडून विठ्ठलाची पूजा झाली होती. यावेळी शेळके यांच्या मुलाकडून विठ्ठलाला शंखातून अभिषेक घालण्यात आला. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर वारकरी संप्रदायातून याला आक्षेप घेण्यास सुरुवात झाली होती.
आम्ही 25 हजारांची पूजा करूनही आम्हाला असा अभिषेक करता येत नसताना अधिकाऱ्याचा मुलगा म्हणून त्याला हा अधिकार मिळाला का? असा आक्षेप घेण्यास सुरुवात झाली. त्यानंतर तातडीने मंदिराचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी घडलेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली. तसेच पुन्हा असा प्रकार घडणार नसल्याची ग्वाही दिली आहे.
देवाच्या पूजेचा अधिकार कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या पत्नीला होता, मग मुलाला असा अभिषेक कसा करता आला? असा मुद्दा घेऊन वारकरी संप्रदायातील मंडळी आक्षेप घेऊ लागली होती. विठ्ठल भक्तांकडून अभिषेक किंवा पूजा असताना कोणत्याही भाविकाला देवाला हात लावू दिला जात नाही. असा अभिषेक देखील करता येत नाही. त्यामुळेच वारकरी संप्रदायाकडून या तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या.
यापूर्वी विठ्ठल जोशी यांनी प्रक्षाळ पूजेच्यावेळी विठ्ठलासमोर स्नान केले म्हणून त्यांचेवर देखील खूप टीका झाली होती. आता या नवीन कार्यकारी अधिकारी यांच्या लहान मुलाने केलेला अभिषेक चर्चेत आला आहे. वास्तविक राजेंद्र शेळके हे महिन्यापूर्वीच मंदिरात रुजू झाले आहेत.
त्यांना अजून मंदिराचे नियम , प्रथा परंपरा याबाबत माहिती नसली तरी मंदिराच्या इतर प्रशासकीय अधिकारी वर्गाने याबाबत त्यांना माहिती देणे गरजेचे होते. त्यातच हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने कार्यकारी अधिकाऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा देखील सुरु झाली आहे.
प्रक्षाळ पूजेच्यावेळी शेळके यांचा दहा वर्षाचा मुलगा सोवळे नेसून आई बाबांच्यासोबत पूजेच्या ठिकाणी उपस्थित होता. यासर्व प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करताना शेळके यांनी या सर्व प्रकारची चौकशी करण्यात येईल असे सांगितले आहे
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज