मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोनाच्या खबरदारीचा राज्य प्रशासनाने जिल्हाबंदीचे आदेश दिले आहेत. करमाळा तालुक्यात चक्क रास्तच खोदून ठेवल्याने उपचाराअभावी रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोलापूर आणि पुणे जिल्ह्याची सीमा असलेल्या कोंढारचिंचोली येथील पुलाच्या पलीकडे चक्क जेसीबीच्या साहाय्याने रस्ताच उकरून टाकण्यात आला आहे. करमाळा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या या कोंढारचिंचोलीचा पूल ओलांडताच थेट पुणे जिल्ह्यातील भिगवण येथे जाता येते.
कोंढारचिंचोली येथील शिवाजी डफळे या वृद्धाला हृदयविकाराचा झटका आल्याने उपचारासाठी जवळ असलेल्या भिगवणला घेऊन जायचे होते. मात्र येथील रस्ताच पूर्णपणे उकरून खड्डा केल्याने गाडी पुलावर नेताच येत नव्हती. अशावेळी पुणे जिल्ह्याच्या भागातून दुसरी गाडी मागवून त्यांना उपचारासाठी हलविण्याचे प्रयत्न सुरु केले. मात्र यात वेळ गेल्याने डोळ्यादेखत तडफडत डफळे यांनी प्राण सोडले.
कोरोनासाठी जिल्हाबंदी करायचीच होती तर रस्ता बंद करायचा मात्र थेट रस्त्यावर भला मोठा खड्डा केल्याने उपचाराअभावी रुग्णाला जीव गमवावा लागला, असं मृताच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. आता जिल्हाबंदीसाठी बेकायदेशीररीत्या असा खड्डा खोदायच्या अघोरी उपाय करणाऱ्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी पुढे येत आहे. या धक्कादायक प्रकारानंतर आता तरी रस्ता पूर्ववत करून देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज