टीम मंगळवेढा टाईम्स ।
अवैध वाळू वाहतूक करणारा टेंपो पोलिस शिपाई गणेश सोलनकर याच्या अंगावर घालून जीवे ठार मारल्याप्रकरणी अटकेत असलेले चालक रणजित सुडके व मालक सागर मासाळ या दोघा आरोपींची पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्याने मंगळवेढा न्यायालयाने पुन्हा नव्याने तीन दिवसाची पोलिस कोठडीत वाढ केली आहे.
दि .२५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ .४० वा . लोक अदालतचे समन्स बजावण्यासाठी मयत गणेश सोलनकर जात असताना त्यांना शिरसी गावच्या हद्दीत अवैध वाळू वाहतूक करणारा टेंपो जात असल्याचे निदर्शनास आले .
यावेळी सोलनकर याने सदर टेंपोस इशारा करून थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र वरील आरोपीने पोलिस कारवाई करेल भितीपोटी वेगाने वाहन चालवून मोटर सायकलला धडक देवून जखमी करून जीवे ठार मारल्याचा प्रकार घडला होता.
तपासिक अंमलदार तथा डी.वाय.एस.पी. राजश्री पाटील यांनी आरोपी रणजित सुडके , सागर मासाळ या दोघांची पाच दिवसाच्या पोलिस कोठडीची मुदत दि .१ ऑक्टोबर रोजी संपत असल्याने त्यांना न्यायालयात उभे केल्यावर न्यायालयाने दि .४ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत वाढ केली आहे.
दरम्यान , तपास अधिकारी डी . वाय.एस.पी.पाटील यांनी वाळू भरून देणारा एका आरोपीला अटक केली असून त्यालाही न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
अधिकारी पाटील यांनी वाळूच्या मुळाशी जावून तपास सुरु केल्याने अनेक वाळूमाफियांचे धाबे दणाणले असून वाळू कुठून उपसली ती वाळू कोणाला पुरवठा केली जाणार होती तसेच या वाळू तपास व्यवसायात अन्य कोण सामील आहे का याचा कसून मूळापर्यंत जावून ते शोध घेत असल्याने अनेकजण या वाळूच्या प्रकरणात अडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
यापुढे ज्या बांधकामाच्या ठिकाणी वाळूचे ढिगारे दिसतील त्या बांधकाम मालकावरही चोरीची वाळू घेतल्याची कारवाई केली जाणार आहे.परिणामी वाळू देणारा व घेणारा या दोघांनाही आरोपी केले जाणार असल्याने चोरीची वाळू नागरिकांनी घेवू नये असे आवाहन पोलिस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज