टीम मंगळवेढा टाईम्स ।
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील टश्शन क्रिकेट सामन्यात चांगलीच दिसून येते. दोन्ही देशांमधील संबंध सुरळीत नसल्याने द्विपक्षीय मालिका खेळवली जात नाहीय.
परंतु आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दोन्ही देश एकमेकांविरुद्ध खेळतात. यूएईमध्ये आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू झाली आहे.
आज रविवारी भारत आणि पाकिस्तानदरम्यान दोन्ही संघांचा पहिला सामना होणार आहे. विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्ध आतापर्यंत शंभर टक्के निर्भेळ यश मिळविले आहे. भारतीय संघ सध्या दमदार फॉर्ममध्ये दिसत आहे.
तसेच विश्वचषकाचा दावेदारीही समजला जात आहे. टी-ट्वेंटी विश्वचषकात आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यात भारताने पाचही सामने जिंकले आहेत. त्यामुळे यंदा पुन्हा भारतालाच ‘मौका’ मिळणार का याची उत्सुकता प्रत्येक चाहत्याला लागली आहे.
२००७ विश्वचषक
या स्पर्धेत भारताने प्रथम फलंदाजी करत ९ गडी गमावून १४१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने ७ गडी गमावून तितक्याच धावा केल्या. सामना बरोबरीत सुटल्याने हा सामना बॉल आउटमध्ये पोहोचला.
भारताने हा सामना जिंकून टी-ट्वेंटी विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध पहिला विजय मिळविला. त्यानंतर दोन्ही संघ अंतिम सामन्यात पुन्हा समोरासमोर आले. भारताने प्रथम फलंदाजी करत ५ गडी गमावून १५७ धावा बनवल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानी संघ १५२ धावांवर सर्वबाद झाला. भारताने प्रथमच टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकून इतिहास रचला.
२०१२ विश्वचषक
भारत आणि पाकिस्तानचे संघ थेट २०१२ च्या टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत समोरासमोर आले. भारताने प्रथम शानदार गोलंदाजी करून पाकिस्तानला १२८ धावांवर रोखले. त्यानंतर दमदार फलंदाजी करून १७ व्या षटकात २ गडी गमावून विजय निश्चित केला.
२०१४ विश्वचषक
भारत आणि पाकिस्तानचा सामना २०१४ मध्ये पुन्हा एकदा झाला. यात भारताने विजयी परंपरा कायम राखली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानी संघ ७ गडी गमावून १३० धावा करू शकला. भारताने तीन गडी गमावून १८.३ षटकात दिलेले आव्हान अगदी सहज पार केले.
२०१६ विश्वचषक
या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानी फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करताना अडखळले. पाकिस्तानी संघाने ५ गडी गमावून ११८ धावा करू शकला. भारताने हे लक्ष्य १५.५ षटकात ४ गडी गमावून सहज पार केले आणि विजयीरथ कायम ठेवला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज