टीम मंगळवेढा टाईम्स ।
मालमत्ता कराच्या थकीत बिलापोटी मैंदर्गी येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू, कन्नड व मराठी माध्यमांच्या तीन प्राथमिक शाळा मैंदर्गी नगर परिषदेने सील केल्या आहेत. त्यामुळे मागील दोन दिवसापासून जिल्हा परिषदेच्या या तीन शाळा चक्क व्हरांडयात सुरू आहेत.
मैंदर्गी न.प.ची जिल्हा परिषदेच्या तीन शाळांकडे १२ लाख ३८ हजार ७६३ रुपये मालमत्ता कर व पाणीपट्टी थकीत आहे. या थकबाकीपोटी ही कारवाई करण्यात आली आहे.
मालमत्तांच्या कर व पाणीपट्टी संदर्भात १२ मे २०२२ रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, शिक्षणाधिकारी, पशुधन अधिकारी यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत मैंदर्गी नगरपरिषद हद्दीतील शासकीय कार्यालयाकडे मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या होत्या.
मात्र आव्हाळे यांनी बोलाविलेल्या बैठकीस जिल्हा परिषदेचे बहुतांश अधिकारी गैरहजर राहिले त्यांनी लिपिकावर ही बैठक भागवली.
त्यामुळे यातील गांभीर्य जिल्हा परिषद प्रशासनाच्या लक्षात आलेच नाही. त्यामुळे मैंदर्गी नगर परिषदेने थकबाकीसाठी या तीन शाळा सील केल्या आहेत.
दोन दिवसापासून शाळा बंद : कट्टीमनी
मैंदर्गी नगर परिषदेने थकीत करापोटी जिल्हा परिषदेच्या तीन शाळा सिल केल्या आहेत. यापूर्वी नगर परिषदेकडून मिळालेल्या नोटिसा संदर्भात अक्कलकोट पंचायत समिती व जिल्हा परिषद मुख्यालयात कल्पना दिली होती. मागील दोन दिवसापासून कार्यालय सिल केल्याने वर्ग खोल्यांच्या चाव्या कार्यालयात आहेत. त्यामुळे व्हरांडयात शाळा भरविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषद कन्नड शाळा मैंदर्गीचे मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांनी दिली.
वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय : जावीर
मैंदर्गी येथील जिल्हा परिषदेच्या तीन शाळा थकीत कराकोटी सील करण्यात आल्या आहेत. या संदर्भात वरिष्ठांची चौकशी करून निर्णय घेण्यात येणार आहे. नगरपरिषदेला कराच्या माध्यमातून शिक्षण निधी उपलब्ध होतो.
तोच निधी नगरपरिषदेने शाळेच्या करापोटी वळता करून घेणे अपेक्षित होते. मात्र तसेच झाले नाही. याप्रकरणी लक्ष घालून हा प्रकार वरिष्ठांच्या कानावर घालून यावर तात्काळ निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी दिली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज