मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
गेली दोन वर्षांपासून गाजत असलेल्या, पंढरपूर येथील बहुचर्चित संकल्प नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल ३ कोटी ९३ लाख ७७ हजार रूपयांचा अपहार झाल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले आहे.
याप्रकरणी शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यात पतसंस्थेचा मुख्य प्रवर्तक तथा चेअरमन प्रथमेश सुरेश कट्टे (रा. पंढरपूर), संचालक सचिव, तथा व्यवस्थापक अविनाश दत्तात्रय ठोंबरे (रा.करकंब ) या दोघांना पुणे येथे पकडून अटक करण्यात आल्याची माहिती गुन्हे पोलीस निरीक्षक प्रशांत भागवत यांनी दिली.
सन २०१९ मध्ये फार मोठा गाजावाजा करत येथे संकल्प नागरी सहकारी पतसंस्थेचा शुभारंभ करण्यात आला होता. सुरूवातीला ठेवी मिळविण्यासाठी मोठमोठ्या बक्षिसांच्या योजना जाहीर करण्यात आल्या. त्यामुळे अगदी कांही दिवसांत संस्थेकडे कोट्यवधींच्या ठेवी जमा झाल्या.
मात्र, मुदत संपल्यानंतर ठेवींची रक्कम परत मिळत नसल्याचे समोर आल्याने शेकडो ठेवीदार हादरून गेले. त्यातूनच अनेकांनी पोलीस तसेच संबंधित प्रशासनाकडे फसवणुकीच्या तक्रारी दाखल केल्या. त्यानुसार यापूर्वीही गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, जिल्हा उपनिबंधकांनी दिलेल्या आदेशान्वये विशेष लेखापरिक्षक वर्ग-२ (सहकारी संस्था) बप्पाजी पवार (रा.सोलापूर) यांनी संस्थेची तपासणी केली. त्यामध्ये अनेक गंभीर प्रकार समोर आले असून त्याबाबतची फिर्याद त्यांनी शहर पोलिसांत दाखल केली आहे.
दाखल फिर्यादीनुसार, प्रथमेश कट्टे व अविनाश ठोंबरे या दोघांनी संगनमताने सभासदांच्या वसूल भागभांडवलातील ३० लाख रूपयांचा अपहार केला. तसेच मुदत संपलेल्या एकूण ३ कोटी ६३ लाख ७७ हजार इतक्या ठेवींच्या रक्कमेचा विनियोग संस्थेच्या सभासदांना कर्ज देण्यासाठी अथवा रोखता व तरलतेसाठी गुंतवणूक न करता कट्टे व ठोंबरे या दोघांनी वैयक्तीक व संयुक्तीकरित्या रक्कमेचा अपहार केला.
मुदत संपल्यानंतरही ठेवीची रक्कम परत न करता ठेवीदारांचा विश्वासघात केल्याचे चौकशीत निदर्शनास आले. यात १२ ठेवीदारांनी त्यांची ३९ लाख ९४ हजार रूपये इतकी ठेवीची रक्कम मुदत संपूनही मिळत नसल्याची तक्रार दाखल करून तसा जबाब नोंदविला होता.
येथील लेखापरिक्षक कार्यालयात याबाबतची कागदपत्रे जमा करण्यात आली होती. चौकशी प्रक्रियेदरम्यान सचिव तथा व्यवस्थापक अविनाश ठोंबरे याने दि.९ नोव्हेंबर २०२० रोजी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे ३४ ठेवीदारांची यादी सादर केली होती. त्यानुसार एकूण २ कोटी ३६ लाख ५० हजार इतक्या रक्कमेच्या ठेवीचा अपहार झाल्याचे निदर्शनास आले.
दि.१७ ऑगस्ट २०२२ रोजी ३४ व ४९ ठेवीदारांच्या याद्या ठोंबरे याने सादर केल्या. त्यामध्ये अनुक्रमे ३६ लाख ७३ हजार व ५० लाख ६० हजार अशा ८७ लाख ३३ हजारांचा अपहार झाल्याचे समोर आले. त्यानुसार १३२ ठेव पावत्यांद्वारे ठेवीदारांनी ठेवलेल्या ३ कोटी ६३ लाख ७७ हजार रूपये इतक्या रक्कमेचा अपहार करण्यात आला.
अशा प्रकारे एकूण ३ कोटी ९३ लाख रूपयांचा अपहार करून फसवणूक करण्यात आले असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले असल्याचे या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार कागदपत्रांचे बनावटीकरण, अपहार, गैरव्यवहार, फसवणूक अशा प्रकारचा ठपका ठेवत विविध कलमान्वये हा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस हवालदार संजय मुळे हे करीत आहेत.
तीन गंभीर गुन्ह्यातील तिघे एकाचवेळी जाळ्यात
संकल्प पतसंस्थेतील अपहार प्रकरणी यापूर्वीही एक गुन्हा दाखल झालेला होता. त्यामध्ये मुख्य प्रवर्तक प्रथमेश कट्टे पोलिसांना हवा होता. तसेच नवीन गुन्ह्याची कुणकुण लागल्याने अविनाश ठोंबरे हा पसार झाला होता. गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पुणे बाणेर) येथील हायप्रोफाईल सोसायटीतील एका अलिशान बंगल्यात शुक्रवारी सकाळी अचानक छापा टाकण्यात आला.
त्यामध्ये कट्टे व ठोंबरे या दोघांसह येथील भूखंड घोटाळ्यातील दादा पवार हाही जागेवर सापडला. कोट्यवधींच्या घोटाळ्यातील हे तिघेही नांव-गांव बदलून अतिशय चैनीत राहताना सापडल्याचे सहा. पोलीस निरीक्षक भागवत यांनी सांगितले.
नोंदणी प्रमाणपत्र मिळवितानाही फसवणूक
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंढरपूर शाखेत पतसंस्थेचे चालू खाते असून त्यामध्ये दि. १ जानेवारी २०१९ रोजी ५० लाख, तर ८ जानेवारी २०१९ रोजी ५३ लाख १० हजार रूपये असल्याचा बनावट बँक खाते बाकी दाखला जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर यांच्या कार्यालयास सादर करण्यात आला. या दाखल्याच्या आधारे फसवणूक करून मुख्य प्रवर्तक प्रथमेश कट्टे याने दि. ८ जानेवारी २०१९ रोजी पतसंस्थेच्या नावाने नोंदणी प्रमाणपत्र मिळविल्याचे समोर आले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.(स्रोत:पुण्यनगरी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज