टीम मंगळवेढा टाईम्स।
कृष्णा खोरे पाणी संघर्ष चळवळीचे संस्थापक निमंत्रक पद्मभूषण क्रांतिवीर कै. डॉ. नागनाथअण्णा नायकवडी आणि कृष्णा खोरे पाणी संघर्ष चळवळीचे अध्यक्ष आ.भाई कै.डॉ. गणपतराव देशमुख यांच्या प्रेरणेतून अथकपणे पाण्यासाठी लढा उभा राहिला.
पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं हा चळवळीचा केंद्रवर्ती हेतू ठेवून शेतकर्याच्या रानात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही, या ध्यासाने पाण्यासाठीची संघर्ष चळवळ उभी राहिली.
या वर्षीची ३२ वी पाणी संघर्ष परिषद आज सांगोला येथे होणार असून क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी आणि भाई आ. गणपतराव देशमुख यांच्या सोबतीने पाणी चळवळीमध्ये कार्यकर्ता म्हणून अविरतपणे लढा दिलेले प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद होणार आहे.
आज बुधवार २६ जून रोजी दु. १ वाजता लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती निमित्ताने कृष्णा खोर्यातील तेरा दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील आणि विशेषत: आटपाडी, सांगोले, मंगळवेढा व जत तालुक्यातील जनतेची ३२ वी पाणी संघर्ष परिषद होणार आहे.
शेतकर्याच्या हितासाठी आणि कल्याणासाठी संघर्षातून हक्काचे पाणी मिळू शकते. भीमा, माण व कोरडा नदीला कालव्याचा दर्जा देऊन त्यावरील सर्व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून देण्यासाठी. मंगळवेढा उपसा सिंचन योजना सुरू करण्यासाठी.
उजनी उजवा कालवा व जत, सांगोला, मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ ६ व्या टप्प्यातील अपूर्ण कामे पूर्ण करण्यास निधीची व्यवस्था करण्यासाठी. महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने पाण्याचे दर छोट्या शेतकर्यांना परवडण्या एवढेच ठेवावेत आणि समान पाणी वाटपाची अंमलबजावणी करावी यासाठी आग्रह धरण्याकरिता.
यासह पाण्यासंदर्भातील अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी ही पाणी संघर्ष परिषद होत आहे. सांगोला येथील मंगळवेढा रोडवरील रामकृष्ण लॉन्स व्हिला येथे ही परिषद होणार असून या परिषदेचे निमंत्रक वैभवकाका नागनाथ नायकवडी हे आहेत.
दुपारी १ वाजल्यापासून सुरू होणार्या ३२ व्या पाणी संघर्ष परिषदेमध्ये ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. बाबुराव गुरव, माजी आ.राजेंद्रअण्णा देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ.अनिकेत देशमुख, अॅड. सुभाष पाटील, प्रा. आर. एस. चोपडे, प्रा. बाळासाहेब नायकवडी, विश्वंभर बाबर, अॅड. सरफराज बागवान, अनिल पाटील, प्रा. दत्ताजीराव जाधव हे प्रमुख वक्ते सहभागी आहेत.
पिढ्या न पिढ्या दुष्काळाशी सामना करणार्या शेतकर्यांना कृष्णा खोर्यातील आपल्या हक्काचे पाणी मिळावे यासाठीचा संघर्ष पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी या देशभक्ताने ११ जुलै १९९३ रोजी पहिली पाणी परिषद घेऊन पुकारला.
त्याला आता ३१ वर्षे पूर्ण होत आहेत. आटपाडी तालुका केंद्रबिंदू मानून सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील तेरा दुष्काळी तालुक्यातील जनतेची चळवळ उभी केली.
नागनाथअण्णा व आ. भाई डॉ. गणपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पाणी संघर्ष चळवळीच्या माध्यमातून अत्यंत चिवटपणे जनतेने लढा देऊन सरकारला कृष्णा खोरे विकास महामंडाळाची स्थापना करायला भाग पाडले.
गेल्या ९ वर्षांपूर्वी आटपाडी आणि सांगोला तालुक्यातील बुद्धेहाळ तलावात पाणी आले. पाणी संघर्ष परिषदेचा हा आजवरचा यशस्वी इतिहास आहे. हा एका दीर्घ लढ्याचा इतिहास आहे. अपूर्ण कामांच्या आणि हक्काच्या पाणी लढाईसाठी अजूनही शेतकर्यांना लढावे लागणार आहे. त्यासाठीच या पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सर्व दुष्काळग्रस्त तालुक्यातील बंधू-भगिनींनी हजारोंच्या संख्येने ३२ व्या पाणी परिषदेस उपस्थित राहावे असे आवाहन निमंत्रक शेतमजूर, कष्टकरी शेतकरी संघटना, पाणी संघर्ष चळवळ वैभवकाका नायकवडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज