टीम मंगळवेढा टाईम्स ।
ठाकरे सरकारला मराठ्यांची ताकद दाखविल्याशिवाय राहणार नाही. ज्याप्रमाणे बीड जिल्ह्यात मराठा समाजाचा मोठा मोर्चा निघाला होता, त्याचप्रमाणे सोलापुरात मराठा समाजाचा मोठा मोर्चा काढण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाच्या तयारीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा समाजाचे नेते तथा अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील शासकीय विश्रामगृहात मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मोर्चाचा निर्णय घेण्यात आला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मुद्द्यावर राज्य सरकार छत्रपती संभाजीराजे यांच्याशी चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे आश्वासन दिले आहे
एक गट सरकारशी चर्चा करीत असला तरी एक गट हा मैदानावर आंदोलन करणार आहे. सरकारवर दबाव टाकण्यासाठी सोलापुरात मराठा समाजाचा मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा पश्चिम महाराष्ट्राच्या द़ृष्टीने सर्वात मोठा मोर्चा असणार आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी दोन गट असले तरीही दोन्ही गटांचा उद्देश हा एकच आहे. त्यासाठी गाव, तालुका व जिल्हा पातळीवरील मराठा समाजातील घटक मोर्चामध्ये सहभागी झाला पाहिजे. यासाठी सर्व समाजबांधवांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शहर व जिल्ह्यातील मराठा समाजातील आमदारांशी चर्चा करण्यात येणार आहे.
यावेळी पाटील यांनी मोर्चा कसा काढावा याबाबत मराठा समाजबांधवांकडून मते जाणून घेतली. बैठकीस किरण पवार, नितीन चव्हाण, राम गायकवाड, सोमनाथ राऊत, श्रीकांत घाडगे, प्रताप कांचन, अजिंक्य पाटील आदी उपस्थित होते.
मराठा समाजाचा सोलापुरात मोठा मोर्चा काढण्यासाठी गावपातळीवरील नियोजनासाठी कमीत कमी पंधरा दिवस लागतील.
शहरात हा मोर्चा काढण्यात येणार असल्याने गाड्यांचे नियोजन करावे लागणार आहे. आलेली गर्दी व मोर्चाचे नेटके नियोजन करावे लागणार असल्याचा सूर याप्रसंगी उपस्थित असलेल्या मराठा समाजबांधवांमधून निघाला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज