टीम मंगळवेढा टाईम्स ।
दहावी-बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्चपासून सुरू होणार आहेत.परीक्षेपूर्वी अभ्यासक्रम शिकवून पूर्ण व्हावा, यासाठी आता रविवारी सुटी दिवशीही शाळा भरवाव्या लागणार आहेत.
स्थानिक पातळीवर मुख्याध्यापक अभ्यासक्रमाचा आढावा घेऊन तसा निर्णय घेऊ शकतात, अशी माहिती शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जूनपासून ऑफलाइन शाळा सुरू झाल्याच नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असतानाच दुसरीकडे प्रतिबंधित लसीकरणाचा वेगही वाढत होता. त्यामुळे ऑक्टोबरपासून दहावी-बारावीचे ऑफलाइन वर्ग सुरू झाले.
तरीही, अनेक विद्यार्थी शाळेला जात नव्हते. परंतु, 23 नोव्हेंबरपासून सर्वच शाळा ऑफलाइन सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढली. तरीही, एसटी वाहतूक बंद असल्याने खेड्या-पाड्यातील मुलामुलींना शाळेत जाण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.
विविध अडचणींमुळे लाखो विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून दूर राहावे लागले. अनेकांना ऑनलाइन शिक्षण पचनी पडले नाही. त्यामुळे शिक्षकांना पुन्हा एकदा पूर्वी शिकवलेल्या अभ्यासक्रमाचा आढावा घ्यावा लागणार आहे.
तत्पूर्वी, शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. बारावीची तोंडी तथा प्रात्यक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारीपासून तर दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा 25 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यानंतर लगेचच लेखी परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
अशा परिस्थितीत आता सुटी दिवशीही विशेषत: ग्रामीण भागातील संपूर्ण विद्यार्थ्यांकडे ऑनलाइनची साधने उपलब्ध नसल्याने ऑफलाइन शाळा सुरू ठेवाव्या लागणार आहेत.
परंतु, वरिष्ठ स्तरावरून लेखी आदेश नसल्याने आम्ही कसा निर्णय घेऊ, असेही काही मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे. शालेय शिक्षण विभागातील या गोंधळात विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.(स्रोत:सकाळ)
सुटी दिवशीही शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय
दहावी-बारावीचा अभ्यासक्रम परीक्षेपूर्वी शिकवून पूर्ण होईल की नाही, यासंदर्भात मुख्याध्यापकांनी आढावा घ्यावा. त्यानुसार ते स्थानिक परिस्थिती पाहून सुटी दिवशीही शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेऊ शकतात.- दत्तात्रय जगताप, संचालक, माध्यमिक शिक्षण, पुणे
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज