मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांसाठी काही दिवस उरले आहेत. विद्यार्थी परीक्षांच्या तयारीला लागले आहेत. असे असताना महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भात मोठा निर्णय घेतलाय.

काय आहे हा निर्णय? या विद्यार्थ्यांवर काही परिणाम होणार का? सविस्तर जाणून घेऊया.
महाराष्ट्र बोर्डाकडून प्रात्यक्षिक परीक्षांसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा पहिल्यांदाच बाह्य परीक्षकांची अदलाबदल केली जाणार आहे. खासगी किंवा विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना सरकारी अनुदानित शाळांमध्ये,

तर अनुदानित शाळांमधील शिक्षकांना खासगी शाळांमध्ये बाह्य परीक्षक म्हणून नियुक्त केले जाणार आहे. हा बदल परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि निष्पक्ष बनवण्यासाठी असल्याचे सांगण्यात आले आहे.

गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर उपाय
प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षेत कॉपी किंवा इतर अनियमितता पूर्णपणे थांबवाव्यात, असा यामागे बोर्डाचा हेतू आहे. यापूर्वी काही केंद्रांवर असे प्रकार आढळले होते.

त्यामुळे आता बाह्य परीक्षकांची सरमिसळ करून विश्वासार्हता वाढवली जाणार असून यामुळे विद्यार्थ्यांना खरे गुण मिळतील आणि परीक्षा प्रक्रिया स्वच्छ राहील.

शिक्षण अधिकाऱ्यांची विशेष तपासणी पथके
प्रत्येक जिल्ह्यातील किमान 10 टक्के शाळांमध्ये प्रात्यक्षिक परीक्षा चालू असताना शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांची विशेष पथके थेट भेटी देऊन तपासणी करतील.

ही पथके प्रात्यक्षिके कशी घेतली जात आहेत?, तोंडी परीक्षा योग्य चालली आहे का?, याची खात्री करतील. परीक्षेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी हा उपाय आहे.
बाह्य परीक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम
प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होण्यापूर्वी 7 जानेवारी रोजी सर्व बाह्य परीक्षकांसाठी एक विशेष उद्बोधन वर्ग आयोजित केला जाणार आहे.

या वर्गात परीक्षकांना प्रात्यक्षिकांमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी तपासायच्या, गुण कसे द्यायचे, नियम काय आहेत, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले जाईल. यामुळे परीक्षा अधिक एकसमान आणि न्याय्य होईल.
परीक्षा कधी?
बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होतील, तर त्यानंतर 10 फेब्रुवारीपासून लेखी परीक्षा सुरू होतील.
दहावीच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा 2 ते 18 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहेत. लेखी परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरू होतील. विद्यार्थ्यांनी या तारखा लक्षात ठेवून तयारी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्रांसाठी नवे कठोर नियम
परीक्षेत गैरप्रकार आढळल्यास परीक्षा केंद्रांची मान्यता कायमची रद्द होऊ शकते. केंद्रांवर पक्के भिंतीचे कंपाउंड, स्वच्छ स्वच्छतागृहे, पाण्याची व्यवस्था आणि प्रत्येक खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्यात आले आहेत. भिंत पडलेली असल्यास लोखंडी जाळी लावावी लागेल.
पर्यवेक्षकांच्या मोबाईल कॅमेऱ्यांना झूमद्वारे जोडले जाणार आहे. जेणेकरून वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्व हालचाली दिसतील. या उपायांमुळे परीक्षेतील अनियमितता पूर्णपणे बंद होतील, असे बोर्डाचे विभागीय अध्यक्ष औदुंबर उकिरडे यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













