टीम मंगळवेढा टाईम्स।
लोकसभेचे भाजप उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या मंगळवेढा दौऱ्यात महायुतीमधील भाजप व मित्र पक्षांच्या बैठकीस परिचारक गट, रिपाइं, रासप, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दांडी मारली. या घटनेने तालुक्यातील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
काँग्रेसमधून आमदार प्रणिती शिंदे यांची उमेदवारी निश्चित झाल्यापासून त्यांनी मंगळवेढ्यास दौरे करून मतदारसंघातील प्रश्नावर रान उठविण्यास सुरवात केली. अशा परिस्थितीत भाजपकडून डजनभरापेक्षा अधिक नावे चर्चेत होती.
मात्र अखेर आमदार राम सातपुते यांचे नात अंतिम झाले. आमदार प्रणिती शिंदे व आमदार राम सातपुते यांच्या सोशल वॉर देखील जोरात सुरू असतानाच सातपुते यांनी
आमदार समाधान आवताडे यांच्या कार्यालयात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर मतदारसंघ अध्यक्ष राजेंद्र सुरवसे यांच्या निवासस्थानी भाजप मित्रपक्षांसह बैठकीस हजेरी लावली.
या बैठकीला मित्र पक्षाचे पदाधिकारी उपस्थित नव्हते. राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष रामेश्वर मासाळ, प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी, तालुकाध्यक्ष भारत बेदरे यांची यावेळी उपस्थिती होती.
मात्र प्रशांत परिचारक समर्थक, शिवसेना रिपाइं व रासपचे तालुका व जिल्हास्तरीय कोणीच पदाधिकारी फिरकले नाहीत. याशिवाय राष्ट्रवादीचे शहरातील इतर पदाधिकारीदेखील या बैठकीस उपस्थित राहिले नाहीत.
वास्तविक पाहता रिपाई, रासप, शिवसेना, राष्ट्रवादी, प्रशांत परिचारक गटांची भूमिका कायम ठेवल्यास पक्षीय उमेदवाराला भविष्यात अडचणीला सामोरे जावे लागणार आहे. या दृष्टीने त्यांची नाराजी दूर करण्यास किती यश येते यावर तालुक्यातील मताधिक्य ठरणार आहे.(स्रोत:सकाळ)
——————–
अचानक निरोप आल्याने बाहेरगावी असल्यामुळे या बैठकीस उपस्थित राहता आले नाही, राष्ट्रवादी अजित पवार गटाची स्वतंत्र बैठक घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.-अजित जगताप, मतदारसंघ अध्यक्ष, राष्ट्रवादी.
रासपचे उमेदवार महादेव जानकर यांना परभणीमध्ये भाजप पदाधिकाऱ्याकडून विरोध सुरू आहे. ती भूमिका कायम राहिल्यास इथे देखील त्या संदर्भात विचार करावा लागेल. दामाजी मेटकरी, जिल्हाध्यक्ष, रासप
सदर बैठकीसंदर्भात वरिष्ठांकडून सूचना नव्हत्या. संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांच्यासमवेत कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन प्रचारातील रणनीती निश्चित करू. – प्रतीक किल्लेदार, शहराध्यक्ष, शिवसेना.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज