टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे २०२४-२५ शैक्षणिक वर्ष यंदा १२ जूनपासून सुरू झाले आहे. कोरोनामुळे आलेला विस्कळितपणा विद्यापीठाने आता सुधारला आहे.
विद्यापीठाने एक पाऊल पुढे टाकत परीक्षा पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला असून आगामी परीक्षा यापुढे सरमिसळ पद्धतीने होणार आहेत. तसेच पूर्वीची परीक्षा केंद्रेही बदलून दुसऱ्या महाविद्यालयांमध्ये केंद्रे सुरू केली आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी सध्या १०८ महाविद्यालये संलग्नित असून त्याअंतर्गत दरवर्षी ७८ हजारांपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात.
पण, जिल्ह्यातील १४ अभियांत्रिकी व १४ औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांपैकी केवळ ११ महाविद्यालयेच विद्यापीठाशी संलग्नित आहेत.
उर्वरित महाविद्यालयांनी ‘बाटू’चा पर्याय निवडला आहे. त्यांनाही संलग्नित करण्यासाठी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र. कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा व परीक्षा संचालक डॉ. श्रीकांत अंधारे यांनी परीक्षा विभागावरच फोकस केला आहे.
विद्यापीठाने पहिल्यांदाच ‘पेट’ ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून जगभरातील विद्यार्थ्यांना परीक्षेत सहभाग घेता येईल हा हेतू आहे. यानंतर आता परीक्षा पद्धतीत बदल करून सरमिसळ पद्धतीचा अवलंब करण्याचाही निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी यंदा हा पॅटर्न राबविला होता. दरम्यान, आता सर्वच महाविद्यालयांमध्ये पदवी व पदव्युत्तर पदवीसाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झाले आहे.
त्यानुसार सध्या प्रवेश सुरू असून अभियांत्रिकीच्या प्रवेशाला ‘सीईटी सेल’कडून पुढील आठवड्यात सुरवात होणार आहे.
सरमिसळ पद्धती म्हणजे काय?
एका महाविद्यालयातील परीक्षार्थी आता परीक्षेवेळी दुसऱ्या महाविद्यालयातील केंद्रांवर परीक्षा देतील. विशेष बाब म्हणजे एकाच परीक्षा हॉलमध्ये (वर्गात) विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था असणार आहे.
एकामागे एक बसलेले विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांचे असतील, अशी सरमिसळ पद्धत परीक्षेवेळी अवलंबली जाणार आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी विद्यापीठाने असा बदल करण्याचे नियोजन केले आहे.
आगामी परीक्षेत नवा पॅटर्न
कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाकडून विद्यार्थीहिताच्या दृष्टीने प्रत्येक निर्णय घेतला जात असून त्यातून विद्यापीठाचा नावलौकिक देखील निश्चितपणे होईल. आता कॉपीमुक्त परीक्षेसाठी सरमिसळ पद्धतीने परीक्षा घेण्याचे नियोजन आहे.
एखाद्या ठिकाणी जवळपास दुसरे परीक्षा केंद्र नसल्यास त्याठिकाणी पेपर सुरू होऊन संपेपर्यंत त्याठिकाणी बैठे पथक नेमले जाणार आहे.- डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्र. कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज