टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यातील एका गावात फेसबुकवरील ग्रुपमुळं अख्खं गाव वैतागलं आहे. वैतागलेल्या या गावातील जवळपास 50-60 नागरिक पोलिसांकडे तक्रार द्यायला पोहोचले.
प्रकरण आहे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मळेगाव येथील. मळेगाव विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेले गाव आहे.
राज्यभरात जलयुक्त शिवार अभियानमध्ये प्रथम पुरस्कार प्राप्त झाल्याने मळेगावची सर्वत्र ओळख आहे.
याशिवाय तंटा मुक्त अभियानामध्ये विशेष शांतता पुरस्कार प्राप्त झालेला आहे. जवळपास 3600 लोकसंख्या असलेल्या या गावात बहुतांश लोक हे उच्चशिक्षित असल्याने केवळ बार्शीतच नाही.
तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात मळेगावची वेगळी ओळख आहे. मात्र याच गावातील महिलांची बदनामी फेसबुकवरील एका ग्रुपच्या माध्यमातून होत आहे.
‘मळेगाव पोलखोल’ फेसबुकवरील ग्रुप
‘मळेगाव पोलखोल’ असे या फेसबुकवरील ग्रुपचे नाव असून यामध्ये मळेगाव येथील महिलांविषयक आक्षेपार्ह आणि बदनामी करणारे पोस्ट शेअर केल्या जात आहेत. गावच्या महिला सरपंचांविरोधात देखील आक्षेपार्ह पोस्ट केल्या जात आहे.
या विरोधात कारवाईची मागणी करण्यासाठी मळेगावातील सुमारे 50-60 नागरिकांनी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांची भेट घेतली.
या ग्रुपमुळे गावातील महिलांचे आयुष्य उध्वस्त होत आहे. त्यांचे संसार मोडले जात आहे. नांदायला गेलेल्या विवाहित महिलांचे नांदने अवघड झाले आहे. अशा तक्रारीचा पाढा तक्रारदार महिलांनी यावेळी वाचून दाखवला.
केवळ महिलांची बदनामीच नव्हे तर जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट देखील या ग्रुपवर शेअर केल्या जात आहेत. पोलखोलच्या नावाखाली गावातील प्रतिष्ठीत पुरुष, महिला यांची बदनामी केल्या जाणाऱ्या पास्ट टाकल्या जात आहेत.
त्यामुळे या अकाऊंटची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावी अशी मागणी मळेगावच्या ग्रामस्थांनी केली आहे.
पोलीस अधीक्षकांकडून कारवाईचे आश्वासन
दरम्यान या फेसबुक अकाऊंटची माहिती यापूर्वी पांगरी पोलीस ठाण्याला दिली होती. वारंवार चकरा मारून देखील कारवाई झाली नाही. हे फेसबुक अकाऊंट चालवणारे गावातीलच तरुण आहेत.
काही संशयित तरुणांची नावे देखील आम्ही पोलिसांना दिली होती. मात्र पांगरी पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे आम्ही पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची भेट घेतली आहे.
हे सगळं गंभीर असून बदनामीमुळे एखादी व्यक्ती टोकाचे पाऊल देखील उचलू शकते. त्यामुळं तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आम्ही केली असून पोलीस अधीक्षकांनी कारवाईचे आश्वासन दिल्याची प्रतिक्रिया मळेगावच्या सरपंच ज्योती माळी यांनी दिली.(स्रोत:ABP माझा)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज