टीम मंगळवेढा टाईम्स।
आषाढी यात्रेच्या दरम्यान कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी १७ जुलै ते २५ जुलै अशी संचारबंदी करण्याबाबत आदेश आले होते. मात्र संचारबंदीचा कालावधी कमी करावा अशी मागणी अनेक लोकांमधून होत होती.
त्यानुसार पंंढरपूर तालुक्यातील ९ गावातील संचारबंदीचा कालावधी आता १८ जुलै ते २२ जुलै असा चार दिवसांचा करण्यात आला असल्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी काढले आहेत.
शासनाने चालू वर्षी आषाढी वारीसाठी मानाच्या १० मानाच्या पालख्यांचे पादुकांना ठराविक वारकऱ्यांच्या उपस्थितीत १९ जुलै रोजी पंढरपूर मध्ये येण्यास परवानगी दिली आहे.
पादुका ठराविक लोकांसमवेत वाखरी (ता. पंढरपूर) येथे आल्यावर दरवर्षीप्रमाणे यावर्षी पादुकांसोबत गर्दी राहणार नाही. यामुळे पंढरपूर शहरातील व शहरास लागून असलेल्या भटुंबरे, चिंचोळी भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, गोपाळपूर, वाखरी, कोटी, गादेगाव, शिरढोण, कौठाळी या गावतील लोक हे पादुकाच्या दर्शनासाठी वाखरी व पालखी मार्गावर एकत्र येण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर पादुका विठ्ठल मंदिराकडे जात असताना शहरातील व आजुबाजुच्या परिसरातील लहान – सहान मार्गावरुन किंवा चोरट्या मार्गाने लोक पादुकांचे दर्शनासाठी गर्दी करुन शकतात.
यामुळे १७ जुलै ते २५ जुलै या कालावधीत पंढरपूरकडे जाणारी व येणारी एस.टी.सेव, खाजगी बससेवा बंद करण्यात आली आहे. शासनाने आखून दिलेल्या नियमांचे कोणी उल्लखन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी हजारोंचा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
असा आहे संचारबंदीच्या कालावधीतील बदल
पंढरपूर शहर व गोपाळपूर मध्ये १८ जुलैच्या सकाळी ६ वाजल्यापासून २४ जुलैच्या सायंकाळी ४ वाजेपर्यंत अशी ६ दिवस संचार बंदी करण्यात आली आहे. पंढरपूर शहरातील नगरप्रदक्षिणाचे आतील बाजूस, सर्व घाट, वाळवंट परिसर, मंदिर परिसरामध्ये १८ जुलै रोजीच्या सकाळी ६ वाजल्यापासून २४ जुलैच्या सायंकाळी ४ वाजेपर्यंत अशी ७ दिवस संचार बंदी करण्यात आली आहे.
पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे, चिंचोळी भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, वाखरी, कोर्टी, गादेगाव, शिरढोण व कौठाळी या ग्रामपंचायत हद्दीत १८ जुलैच्या सकाळी ६ वाजल्यापासून २२ जुलैच्या सकाळी ६ वाजेपर्यंत अशी ४ दिवस संचारबंदी करण्यात आली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज