टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात सध्या एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे भगीरथ भालके यांच्या पक्षांतराची. राजकीय वारसा लाभलेले भगीरथ भालके आता ‘शिवसेना शिंदे गटा’चे धनुष्यबाण हाती धरण्याच्या तयारीत आहेत.
मात्र, त्यांच्या या वारंवार बदलणाऱ्या राजकीय भूमिकांमुळे मतदारसंघातील जनता आणि निष्ठावंत कार्यकर्ते आता उघडपणे विचारू लागले आहेत— “भगीरथदादा, तुमची निष्ठा नेमकी कुणाकडे?”

राजकीय धरसोडवृत्तीचा ‘हायव्होल्टेज’ ड्रामा
स्व.भारतनाना भालके यांच्यानंतर त्यांच्या राजकीय वारशाची धुरा भगीरथ भालके यांच्याकडे आली. मात्र, गेल्या काही वर्षांतील त्यांचा प्रवास पाहता, त्यांनी कोणत्याही एका विचारधारेशी निष्ठा राखली नसल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

बीआरएस (तेलंगणा): आधी के.चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत गुलाबी झेंडा हाती घेतला.
राष्ट्रवादी (शरद पवार गट): त्यानंतर पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नशीब आजमावले. काँग्रेस: अधूनमधून काँग्रेसच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या.

शिवसेना (शिंदे गट): आणि आता सत्तेच्या वळचणीला जात शिवसेना शिंदे गटात प्रवेश निश्चित केला आहे. या वारंवार होणाऱ्या ‘कोलांटउड्यांमुळे’ मतदारांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे.
संकटाच्या काळात ‘नॉट रिचेबल’ राहण्याची सवय?
स्व. भारत नानांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत पराभव झाला आणि भगीरथ भालके थेट ‘नॉट रिचेबल’ झाले. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही जनतेने त्यांना नाकारले. पराभवानंतर जनतेची कामे करणे, कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणे आणि संघटन मजबूत करणे अपेक्षित असताना, भालके यांनी जनतेकडे सपशेल पाठ फिरवल्याचा आरोप होत आहे.

निष्ठावंतांची साथ सुटली; आवताडे-परिचारक गट मजबूत
भगीरथ भालके यांच्या अशा धरसोड वृत्तीला कंटाळून अनेक जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आता त्यांचा हात सोडला आहे. नानांवर प्रेम करणारा कार्यकर्ता आता दिशाहीन झाला असून, अनेकांनी आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटामध्ये प्रवेश करणे पसंत केले आहे. “ज्या नेत्याला आपली राजकीय दिशा निश्चित करता येत नाही, त्याच्या मागे किती काळ राहायचे?” असा सवाल कार्यकर्ते विचारत आहेत.

शिवसेनेत तरी टिकणार का?
आज जरी भगीरथ भालके शिवसेनेच्या वाटेवर असले, तरी मतदारसंघात एकच प्रश्न विचारला जात आहे— “शिवसेनेत तरी ते किती दिवस टिकणार?” सत्तेसाठी किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी पक्षांतर करण्याच्या या प्रकारामुळे पंढरपूर-मंगळवेढ्याच्या राजकारणात भालके गटाची पकड ढीली होताना दिसत आहे.
भगीरथदादा, जनतेला आणि कार्यकर्त्यांना आता आश्वासने नकोत, तर स्पष्ट भूमिका हवी आहे. सत्तेच्या राजकारणात तुम्ही तुमची निष्ठा गहाण तर ठेवत नाही ना? असा रोखठोक सवाल आता जनतेच्या दरबारात विचारला जात आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










