टीम मंगळवेढा टाईम्स।
राष्ट्रीय महामार्गातील मंजूर रक्कमेपोटी सात हजाराची लाच तलाठ्याने स्वीकारल्या प्रकरणाशी संबंधीत मंगळवेढा विभागाचे प्रांत अधिकारी यांची जवळपास साडे तीन तास लाचलुचपत विभागाच्या सोलापूर येथील कार्यालयात कसून तपासीक अधिकार्यांनी चौकशी केली असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली.
दरम्यान, मंगळवेढा येथील एका बँंकेच्या जबाबदार अधिकार्याला चौकशीसाठी बोलविण्यात आलेची माहिती समोर येत असल्याने मोठा मासा गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सोलापूर-सांगली या राष्ट्रीय महामार्गात कमलापूर येथील तक्रारदार शेतकर्याचा गट क्र.52 मधून शेतीची पाईपलाईन बाधीत झाली होती.
याची नुकसानभरपाई म्हणून 1 लाख 43 हजार 794 इतकी रक्कम मंजूर झाली होती. ही रक्कम संबंधीत शेतकर्याला देण्यासाठी तलाठी सुरज नळे याने खाजगी दलालामार्फत सात हजार रक्कमेची मागणी केली होती.
ती रक्कम तलाठ्याने स्वीकारुन पलायन केले होते. या प्रकरणी दोघांनाही अटक झाली असून तपासिक अंमलदार पोलीस निरीक्षक उमाकांत महाडीक यांनी या घटनेची कसून चौकशी सुरु केली आहे.
मंगळवेढा उपविभागीय कार्यालयातील जबाबदारी अधिकारी हे प्रांत असून त्यांच्या कार्यालयात लाचेसारखे गंभीर प्रकरण घडल्यामुळे संशयाची सुई वरिष्ठांपर्यंत जात असल्याने
तपासिक अंमलदाराने प्रांत अधिकारी यांना दि.3 एप्रिल रोजी दुपारी चौकशीसाठी सोलापूर येथील लाचलुचपत कार्यालयात बोलावून जवळपास साडे तीन तास प्रश्नांचा भडीमार करुन बोलती बंद केल्याची माहिती समोर येत आहे.
राष्ट्रीय महामार्गाचे कामकाज सुरु झाल्यानंतर स्वत:ची वैयक्तीक मालमत्ता असल्याचे समजून हक्क गाजवत टक्केवारी ठरवून कोटीच्या आकड्यात रक्कमा वसूल केल्याची जोरदार चर्चा होत आहे.
महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गांभीर्यपुर्वक या घटनेत लक्ष घालून कोट्यावधीची बेकायदा माया गोळा करणार्या त्या अधिकार्याची व तलाठयाच्या मालमत्तेची वरिष्ठ पातळीवरुन चौकशी करुन त्यांना बडतर्फ करावे अशी मागणी सुज्ञ नागरिकामधून पुढे येत आहे.
गेल्या अनेक महिन्यापासून हा प्रकार सुरु असल्याने शेतकरी वर्ग या अधिकार्यांच्या व तलाठ्यांच्या छळाला कंटाळले होते. वेळप्रसंगी आंदोलनही करण्यात आले.
मात्र जिल्हयाच्या वरिष्ठ अधिकार्याने या घटनेकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्यानेच काळ सोकावत गेल्याची चर्चा होत आहे.
वसूलीसाठी खास तलाठ्याला संगणकाच्या कामकाजाच्या नावाखाली ठेवून वसूली केली जात असल्याचा आरोप होत आहे. तलाठी आरोपी नळे हा येथील बँकेत टक्केवरी वसूल करण्यासाठी बँक अधिकार्यांना हाताशी धरुन
शासकीय कामकाज सोडून तासंतास बँकेत बसून राहत असे व त्याच्या गाडीतून बँकेच्या कर्मचार्यांना घेवून वेळप्रसंगी टक्केवारीसाठी सोलापूर येथील बँकेच्या मुख्यकार्यालयात जात असल्याचे अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष पाहिल्याची चर्चा आहे.
तपासिक अंमलदार यांनी मंगळवेढा येथील बँकेच्या अधिकार्याला चौकशीसाठी मंगळवारी रोजी बोलविल्याची माहिती समोर येत असून शेतकर्यावर अविश्वास दाखवून ट्क्केवारी साठी वेळप्रसंगी कोरे चेकही शेतकर्यांचे घेण्यात आले असल्याचा सूर उमटत आहे.
क्रॉस चेकींग होणे तितकेच महत्वाचे आहे. तलाठी आरोपी,वरिष्ठ अधिकारी, बँक अधिकारी यांचे मोबाईल लोकेशन तपासल्यानंतर हा सर्व घोटाळा उघड होणार आहे.
यासाठी तपासिक अंमलदाराने घटनेच्या मुळाशी जावून तपास करावा अशी मागणी पुढे येत आहे.
लाचलुचपतच्या अधिकार्यांनी धाड टाकल्यानंतर येथील प्रांत कार्यालयात शुकशुकाट पसरला असून या घटनेमध्ये चौकशीचा ससामिरा आपल्या पाठीमागे लागू नये म्हणून प्रत्येक कर्मचारी हाताची घडी तोंडावर बोट अशा अवस्थेत सध्या असल्याचे चित्र आहे.
सोमवारी आठवड्यातील पहिला दिवस कामकाजाचा असतानाही या कार्यालयात शुकशुकाट जाणवत होता.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज