टीम मंगळवेढा टाईम्स ।
दोन जन्मठेपेच्या शिक्षा झालेल्या एका आरोपीने भरदुपारी धारदार शस्त्राने वार करून तिसरा खून केला. ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथे घडली.
तीनही खून करण्यामागे चारित्र्याचा संशय हे एकमेव कारण असल्याचे सांगण्यात येते. सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वडापूर येथील ज्ञानदेव प्रभू नागणसुरे ( वय ५५ ) सायकलीवर गवताचा भारा घेऊन घराकडे निघाले होते.
यावेळी रस्त्यालगत आमसिद्ध भीमा पुजारी (वय ६५ , रा . वडापूर) जनावरे चारत होता ज्ञानदेव नागणसुरे यांना पाहताच रस्त्यात गाठून आमसिद्ध पुजारी याने धारदार शस्त्राने डोक्यावर, मानेवर, गुडघ्यावर सपासप वार केले.
या हल्ल्यात नागणसुरे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर संशयित आरोपी आमसिद्ध पुजारी शांतपणे घरी गेला.
म्हैस दावणीला बांधली आणि रक्ताळलेले कपडे बदलून फरार झाला अशी माहिती पुढे आली आहे. याआधी आरोपीने सात वर्षांपूर्वी स्वतःच्या पत्नीचा पहाटेच्या वेळी डोक्यात दगड घालून खून केला होता.
पत्नीच्या चारित्र्यावर तो नेहमी संशय घ्यायचा. या खुनाच्या गुन्ह्यात तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. काही दिवसांपूर्वी तो पॅरोलवर गावात आला होता.
आल्यापासून तो दररोज हत्यारे घासून ठेवत होता. मला अजून दोन खून करायचे आहेत, असा तो जाहीरपणे सांगायचा. मयत ज्ञानेश्वर अनैतिक संबंध असल्याचा आरोपीला संशय होता.
याबाबत अलीकडे तो नेहमीच त्याचा जाहीरपणे उल्लेख करायचा. त्यामुळे मयत नागण भीतीच्या सावटाखाली होते. घटनेची माहिती ग्रामस्थांनी मंद्रूप पोलीस ठाण्याला दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन थेटे यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली.
मयत नागणसुरे यांचे शव ताब्यात घेऊन मंदूपच्या ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले. मयताचा मुलगा दत्तात्रेय नागणसुरे याने आमसिद्ध पुजारी याच्या विरोधात वडिलांचा खून केल्याचा गुन्हा दाखल केला.(स्रोत:लोकमत)
दोन खुनात झाली जन्मठेप
आमसिद्ध पुजारी याने १५ वर्षांपूर्वी अंन्रोळी येथील लक्ष्मण सलगरे नामक इसमाचा खून केला होता. आपल्या पत्नीशी सलगरे याचे अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता. या गुन्ह्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली.
जेलमधील वर्तणूक चांगली असल्याने शिक्षेत कपात झाली आणि तो बाहेर आला. त्यानंतर काही महिन्यात त्याने स्वतःच्या पत्नीचा डोक्यात दगड घालून खून केला आणि स्वतः पोलिसात हजर झाला झाली. अलीकडेच तो पैरोलवर गावात आला होता.
कुटुंबच भीतीच्या छायेत
आमसिद्ध पुजारी पॅरोलवर आल्यापासून मला अजून दोन खून करायचे आहेत , असे वारंवार सांगत होता . त्यापैकी ज्ञानदेव नागणसुरे यांचे नाव जाहीरपणे घेत होता ; मात्र दुसरा कोण सांगत नव्हता त्यामुळे आरोपीचे कुटुंबही सतत भीतीच्या छायेखाली वावरत असल्याची ग्रामस्थांत कुजबुज सुरु होती.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज