मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क।
अखंड महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या आणि दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणार्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने २७ जून रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री मा.के चंद्रशेखर राव हे त्यांच्या संपूर्ण मंत्रीमंडळासह श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार आहेत.
महाराष्ट्रात भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून केसीआर वारीच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी येत आहेत असं सांगितलं जातं आहे.
महाराष्ट्रातील अनेक आजी-माजी आमदार, खासदार आणि मातब्बर नेते बीआरएस पक्षात प्रवेश करत आहेत. शेतकरी,युवक आणि कृषी विकासाच्या तेलंगणा मॉडेलच्या माध्यमातून केसीआर त्यांची प्रतिमा तयार करत आहेत.
परंतू यामध्ये केसीआर यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी केली असल्याने व छोटी राज्ये तयार करावी अशी भूमिका घेतल्याने पंढरपूरातील युवक नेते किरणराज घोडके यांनी केसीआर यांना महाराष्ट्राच्या निर्मितीची आणि महाराष्ट्राच्या जाज्वल्य इतिहासाची माहिती नसल्याने ते अशा निरर्थक आणि मराठी लोकांच्या भावना दुखावणारे वक्तव्य करत आहेत असा आरोप केला आहे.
एकीकडे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न होत असताना आता दक्षिणेकडच्या केसीआर यांनी महाराष्ट्राचे तुकडे करण्याची भाषा केल्यामुळे बीआरएस ही भाजपचीच बी टीम असल्याचा संशय सुद्धा यावेळी घोडके यांनी व्यक्त केला आहे.
रिंगण सोहळ्यात वारकर्यांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यासाठी येणारे केसीआर हे जर महाराष्ट्राच्या विभाजनाचा विचार मनात ठेवून आले असतील तर शेकडो महात्म्यांनी बलिदान देऊन आणि आमच्या बापजाद्यांनी रक्त सांडून उभा केलेल्या
अखंड महाराष्ट्राचे तुकडे करण्याची घाणेरडी विचारसरणी घेऊन आलेल्या केसीआर यांनी महाराष्ट्राच्या अखंडतेचं प्रतिक असलेल्या विठ्ठलाच्या पावन नगरीत पाय ठेऊ देणार नाही असा इशारा ही यावेळी किरणराज घोडके यांनी दिला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज