टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा उपविभागीय अधिकारी कार्यालयातील तलाठी सुरज रंगनाथ नळे यांने 7 हजार रुपयांची लाच घेतली असून तो लाचेची रक्कम घेऊन घटनास्थळावरून पळून गेला आहे.
याप्रकरणी तलाठी सुरज रंगनाथ नळे व खाजगी इसम पंकज महादेव चव्हाण या दोघांविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
मात्र या प्रकरणात आणखी ‘बडे मासे’ यांची नावे एसीबीच्या तपासात समोर येण्याची शक्यता असल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, यातील तक्रार याने मित्राच्या शेतजमिनीमधून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ सांगली-सोलापूर असा महामार्ग गेलेला असून त्यामध्ये शेतजमिनीमध्ये असलेली पाईपलाईन बाधित झाली आहे.
त्यामुळे सदर पाईपलाईनची शासकीय नुकसान भरपाई रक्कम रुपये १,४३,७९४/- रुपये मंजूर झाले असून सदर नुकसान भरपाई मिळने करिता तक्रारदार त्यांच्या मित्राच्या वतीने पाठपुरावा करीत होता.
यातील आरोपी खाजगी इसम चव्हाण याने आरोपी सूरज नळे यांच्या वतीने लाचेची मागणी केली.
व आरोपी सूरज नळे यांनी तडजोडीअंती ७ हजार रु लाचेची मागणी करून सापळा कारवाई दरम्यान सदर लाच रक्कम रुपये ७ हजार रुपये आरोपी सुरज नळे याने स्वीकारून त्यांच्या चार चाकी वाहनातून पळून गेला आहे.
त्यानंतर आरोपी सुरज नळे याला पकडण्याकरिता त्याच्या घराजवळ सापळा लावला असता आरोपी नळे याने त्यांच्या ताब्यातील चार चाकी चाहन बेकायदेशीरपणे तसेच कोणाच्याही जीवाची पर्वा न करता लाच रकमेसह वेगाने पळून गेला आहे.
आरोपी तलाठी सूरज नळे हे लाचेची रक्कम स्वीकारून पथकाच्या जीवितास धोका पोहोचेल अशा रीतीने वाहन चालवून भरधाव वेगाने पळून गेला आहे.
त्यांचा शोध घेतला असता ते मिळून आला नसून आरोपी पंकज चव्हाण यांला त्याच्या राहते निवासस्थानातून ताब्यात घेतले आहे.
ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार, पोलीस निरीक्षक उमाकांत महाडीक, पोलीस अंमलदार मुल्ला, घाडगे, सण्णके, उडाणशिव सर्व अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी केली आहे.
सोलापूर जिल्हयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधीत काही माहिती असल्यास अगर मागणा-या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे टोल फ्री क्रमांक १०६४ वर किंवा पोलीस उपअधीक्षक अॅन्टी करप्शन ब्युरो, श्री छत्रपती शिवाजी रंगभवन चौक सोलापूर येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्गाचे काम तालुक्यातून सुरू झाल्यापासून येथील प्रांत कार्यालय वेगवेगळ्या कारणास्तव चर्चेत आले. यातील जबाबदार अधिकाय्रांनी देखील आपल्या कार्यालयीन कर्मचाऱ्यावर नियंत्रण न ठेवल्यामुळे हे कार्यालय जनतेचे कार्यालयाऐवजी लुटीचे कार्यालय झाले.
त्यामुळे कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर या कार्यालय मध्ये वावर होत असल्याबाबत तक्रारी देखील झाल्या यामध्ये अधिकाय्रांनी देखील कर्मचाऱ्यांची पाठराखण करत मौन व्रत धारण केल्यामुळे शेतकरी वैतागले.
त्यामुळे अनेकांनी टक्केवारी देत मोबदला घेतल्याची चर्चा होत होती. या कार्यालयात सांगोला व मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास बाधित मोबदला मिळवताना झाला. यासाठी पंढरपूर येथील सामाजिक संघटनेने प्रांत कार्यालयासमोर या लाचखोरीवरून हलगीनाद आंदोलन केले.
तर प्रहार संघटने देखील या भूसंपादनाच्या भरपाईवरून व कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मनमानी पद्धतीने मोबदला निश्चित केल्यावरून 26 दिवस आंदोलन केले.
तर बाळासाहेबांची शिवसेना या संघटनेचे संदेश गेजगे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले तरी देखील प्रांत कार्यालयाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये कोणताही बदल झाला नव्हता त्यामुळे त्रस्त झालेल्या बाधितांना शेवटी लाच लुचपत पथकाचा आधार घ्यावा लागला. कारवाईमुळे या कार्यालयातील लाचखोरी उघड झाली आहे मात्र या लाचखोरीत आणखी कोण कोण हिश्शेदार आहेत का याचा तपास पोलीस करणार का? याची चर्चा तालुक्यात सुरू झाली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज