टीम मंगळवेढा टाईम्स ।
चोरी, दरोडे आदी गंभीर गुन्ह्यांतील चार प्रस्तावांतील 34 सराईत गुन्हेगारांना मोक्का लावण्यास विशेष पोलिस महासंचालकांनी मान्यता दिली आहे, असे पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
टेंभुर्णी, पांगरी, वैराग, नातेपुते आदी ठिकाणी झालेल्या घटनांमधील गुन्हेगारांचा यामध्ये समावेश आहे. मोक्का लावण्यासंदर्भातील आणखीन तीन प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत, असेही सातपुते यांनी या वेळी सांगितले.
आषाढी वारीसाठी सुधारित आदेश प्राप्त झाले आहेत. या वारीसाठी सुमारे तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त लावण्याचे नियोजन करण्यात येत आहे. पायी वारीसंदर्भात बंदोबस्ताची फेररचना केली जात आहे.
इसबावी ते पंढरपूर या पालखी मार्गावर पुरेसे सोशल डिस्टन्सिंग ठेवून प्रातिनिधिक स्वरूपात पायी वारी करण्यासाठी पालख्यांना परवानगी देण्यात येणार आहे. प्रत्येक पालखीसोबत दोन वारकरी तर उर्वरित वारकरी वाहनांमधून जाणार आहेत.
या वारीसाठी पंढरपूरच्या आसपासच्या 10 गावांमध्ये 17 ते 24 जुलै या कालावधीत संचारबंदी लावण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे, असे पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी डान्स बार खुलेआम सुरू आहेत, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते म्हणाल्या, याबाबत माहिती घेऊन पोलिसांकडून कडक कारवाई केली जाणार आहे.
अशा प्रकरणांमध्ये कारवाई होण्यापूर्वीच गोपनीय माहिती लीक होण्याच्या घटना घडत असतात. असे प्रमाण निम्मे आहे, असेही त्यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज