सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील 24 शिक्षकांच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते यांनी दिली.
दरम्यान, तालुक्यातील नववी ते बारावीतील 17 टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांनी शनिवारअखेर संमतीपत्र दिले असल्याचे गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख यांनी सांगितले.
तालुक्यातील नववी ते बारावीच्या शाळांची संख्या 79 आहे. त्यामध्ये 22 हजार 867 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी तीन हजार 930 विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळांकडे संमतीपत्र भरून दिले आहे.
नववी ते बारावीपर्यंतच्या तालुक्यातील शिक्षकांची संख्या 954 असून त्यापैकी गणित, इंग्रजी व विज्ञान विषय शिकविणारे 577 शिक्षक आहेत.
शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू होणार म्हणून तालुक्यातील एक हजार 449 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या आतापर्यंत करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 279 शिक्षकांच्या आरटी-पीसीआर तर उर्वरित शिक्षकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या आहेत.
त्यामध्ये 24 शिक्षकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील अनेक शाळांनी आजपासून शाळा सुरू करण्यासाठी पूर्वतयारी केली आहे. शालेय परिसर स्वच्छता करण्याबरोबरच वर्गखोल्यांची साफसफाई करून सॅनिटायझेशन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे तापमान व ऑक्सिजन लेव्हल तपासण्यासाठी थर्मल गन व ऑक्सिमीटर खरेदी केले आहेत.
मात्र, काही संस्थांनी शाळा सुरू करण्याबाबत सावध पवित्रा घेतला आहे. काही संस्थांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. संमतीपत्र देणाऱ्या पालकांची अल्पसंख्या पाहता शाळांतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत साशंकता आहे.
शिक्षणसंस्था, शाळा, पालक व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
राज्य सरकारने 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी त्याबाबतचे अधिकार जिल्हा व महापालिका प्रशासनास दिले आहेत. त्यानुसार कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक येथील प्रशासनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उर्वरित महाराष्ट्रातील शिक्षणसंस्था, शाळा, पालक व विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहेत.
शासनाने शाळा सुरू करण्याची जबाबदारी जिल्हा व महापालिका प्रशासनावर सोपविली आहे. जिल्हा व महापालिका प्रशासनाने ती जबाबदारी शिक्षणाधिकारी व महापालिका प्रशासनाधिकाऱ्यांकडे दिली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी तीच री ओढत शाळा सुरू करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितींवर सोपविला आहे.
राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, शिक्षणाधिकारी शाळा सुरू करण्याबाबत ठोस भूमिका घेत नसतील तर शाळा व्यवस्थापनाने ती जबाबदारी का घ्यावी, असा प्रश्न काही स्थानिक शाळा व्यवस्थापनाकडून उपस्थित केला जात आहे. शिवाय सॅनिटायझेशन, थर्मलगन, ऑक्सिमीटर याचा खर्च कोणी करायचा, हा प्रश्न भेडसावत आहे.(सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज