टीम मंगळवेढा टाईम्स।
प्रत्येक अधिकारी स्वतःला वाटेल तो कायदा, या पद्धतीने काम करत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. भूसंपादनाचे पैसे वाटण्याबाबत कसलीही अडचण नसताना प्रांताधिकारी सातत्याने शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत.
याची स्वतंत्र समिती नेमून चौकशी करून कारवाई करावी याबाबत मंगळवेढा तालुका काँग्रेसने महसूल मंत्र्यांना निवेदन दिले आहे.
दरम्यान, आज सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर मंगळवेढा प्रांत कार्यालयात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.ते काय निर्णय घेतात , याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
मंगळवेढा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करून चार वर्षे पूर्ण झाली. मात्र , अद्याप अनेक शेतकऱ्यांना भरपाई संबंधीची रक्कम मिळाली नसून हा आकडा २०० कोटींपेक्षा जास्त आहे.
चार वर्षांपासून शेतकऱ्यांचे पैसे अधिकाऱ्यांच्या गलथानपणामुळे पडून राहिल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे.
याशिवाय काझी नावाच्या व्यक्तीने औरंगजेब बादशहाने बक्षीस दिलेल्या आठ गावांतील जमिनी माझ्या आहेत, असा खोटा अर्ज करून तक्रार दाखल केली होती. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही.
वास्तविक पाहता काझी इनाम हे रद्द झाले आहे. जिल्हाधिकारी ते महसूलमंत्री व उच्चन्यायालय सर्वत्र काझीच्या विरोधात निकाल मिळाले असून रक्कम वाटण्याच्या स्थगितीचा आदेश सहा महिन्यानंतर रद्द होतो.
तो रद्द होऊनदेखील बराच कालावधी उलटून गेला असूनदेखील प्रांताधिकाऱ्यानी अद्याप शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे देण्याबाबत चालढकल चालूच ठेवली आहे.
संबंधित शासकीय वकिलांनी आपला अभिप्राय दिला असूनदेखील प्रांताधिकाऱ्यांनी साठ दिवस झाल्यानंतर रक्कम वाटप याबाबत विचार करू , असे सांगितले आणि रक्कम वाटपास नकार दिला आहे.
शेतकऱ्यांच्या भावना तीव्र
यावरून शेतकऱ्यांच्या भावना खूप तीव्र झाल्या आहे. शासनाने याची गंभीर दखल घेऊन तत्काळ शेतकऱ्यांची नुकसानभरपाई रक्कम अदा करावी , संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी , अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
भरपाई न मिळाल्याने १३ आत्महत्या
मंगळवेढा तालुक्यातील १३ आत्महत्या या भरपाई रक्कम वाटप न झाल्यामुळे झाल्या आहेत, असा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. आणखी किती मृत्यू होण्याचे प्रांताधिकारी वाट पाहत आहेत, असाही प्रश्न या निवेदनातून महसूलमंत्र्यांना विचारण्यात आला आहे .(स्रोत:पुढारी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज