टीम मंगळवेढा टाईम्स । फीटचा आजार घालवितो, असे म्हणत जादूटोणा करणाऱ्या मांत्रिकाने अल्पवयीन मुलीस गुंगीचे औषध पाजून अत्याचार केल्याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुंगीचे औषध हे देवाचे औषध असल्याचे मांत्रिकाने सांगितले होते.त्यामुळे अंधश्रद्धा कधी संपणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शिवाजी सिद्राम कोल्हे (वय ३७, रा. काळी मशीद, पत्रातालीमजवळ) असे गुन्हा दाखल झालेल्या मांत्रिकाचे नाव आहे.
अल्पवयीन मुलीला फीट (झटके) येत होते, तिच्या आई-वडिलांनी वेगवेगळ्या ठिकाणी उपचार केले मात्र आजार बरा होत नव्हता. नातेवाईकाच्या ओळखीने मांत्रिक शिवाजी कोल्हे याला फेब्रुवारी २०१५ मध्ये घरी बोलावण्यात आले होते.
शिवाजी कोल्हे याने घरात रिंगण ओढून मांत्रिक विद्या करण्यास सुरुवात केली. मुलीला हळद-कुंकू लावले व त्यानंतर पाण्यात काहीतरी टाकून पिण्यासाठी दिले होते.
त्यानंतर तो दोन ते तीन वेळा अशाच पद्धतीने घरी आला आणि तो जादूटोण्याचा प्रयोग करीत डोक्याला काहीतरी घासून निघून जात होता. काही दिवसांनंतर शिवाजी कोल्हे याने अल्पवयीन मुलीला स्वत:च्या काळी मशीद येथील राहत्या घरी एकटीला बोलावून घेतले होते.
घरात हळदी-कुंकवाचे रिंगण आखून पाण्यामध्ये काहीतरी खायला देत असे, त्यानंतर तो मुलीशी अश्लील चाळे करू लागला. हा प्रकार एक ते दीड वर्ष अशाच पद्धतीने सुरू होता. मात्र मुलीला फीट येणे सुरूच होते.
मुलीला उपचाराच्या बहाण्याने सतत आपल्या राहत्या घरी बोलावून घेत होता. गुंगीचे औषध देऊन अत्याचार करीत असे. हा प्रकार मुलीने आई-वडिलांना सांगितला. आई-वडिलांनी शिवाजी कोल्हे याला याबाबत जाब विचारला असता त्याने मुलीसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले.
मुलीसोबत तो विडी घरकूल येथे रूम करून राहू लागला. नंतर दिनांक २९ आॅगस्ट २०१९ रोजी पीडित मुलीला मुलगी झाली. मुलीने शिवाजी कोल्हे आल्यावर लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली.
याचा जाब विचारण्यासाठी मुलीचे आई-वडील काळी मशीद येथील राहत्या घरी शिवाजी कोल्हे याच्याकडे गेले, तेव्हा तो तलवार घेऊन त्यांच्या अंगावर धावून गेला व जीवे मारण्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी मुलीने सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आॅगस्ट २०१७ मध्ये शिवाजी कोल्हे याने मुलीला कर्नाटक येथील मंत्रालय या गावामध्ये घेऊन जाऊन उपचार करावे लागतील, असे सांगितले. मुलीला तेथे नेले. त्या ठिकाणी एका खोलीमध्ये हे देवाचे औषध आहे, असे सांगून दुधामध्ये गुंगीचे औषध टाकून देत होता. मुलीला गुंगी आल्यानंतर तो तिच्यावर अत्याचार करीत होता. तीन दिवस सलग हा प्रकार असाच सुरू होता.
गुन्हा दाखल झालेला मांत्रिक हा भाविकांना फसवत होता, असे समजले आहे. तो रात्रीतून पैशाचा पाऊस पडतो असे सांगून लोकांना गंडवत होता, अशा काही गोष्टी समजल्या आहेत. सध्या तो सोलापुरातून फरार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके यांनी बोलताना दिली.
Solapur A witch tortured a minor girl by giving her a sedative
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज