टीम मंगळवेढा टाईम्स ।
ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या यात्रेची परंपरा आणि भाविकांच्या आरोग्याची काळजी घेत यात्रा साजरी करण्यास परवानगी मिळणार असली, तरी याबाबतचा अंतिम निर्णय आज बुधवारी होणार आहे.
यात्रेतील नंदीध्वज मिरवणुकीत तसेच इतर धार्मिक विधींसाठी किती लोकांना परवानगी देण्यात येणार, याचाही निर्णय होणार आहे.सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेबाबत तत्काळ निर्णय घ्यावा, यासाठी आ. संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ पुणे येथील विभागीय आयुक्त सौरभ राव यांना भेटले.
याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून यावर बुधवारी अंतिम निर्णय होईल, असे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी सांगितले.सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या (गड्डा) यात्रेतील महत्त्वाचे धार्मिक विधी व इतर महत्त्वपूर्ण निर्णयांसाठी भेटीत सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी शिष्टमंडळात आ. संजय शिंदे, सोलापूरचे आ. व मानकरी विजयकुमार देशमुख, यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष जुबेर बागवान, विलास लोकरे, सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष मिलिंद गोरे, अमित रोडगे, अजित शेडजाळे, सचिन कुलकर्णी उपस्थित होते.
यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून फोन आल्यानंतर सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडून विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी प्राथमिक माहिती घेतली होती.
मंगळवारी शिष्टमंडळासोबतच्या चर्चेदरम्यान यात्रेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. विभागीय आयुक्त यात्रा साजरी करण्याबाबत सकारात्मक आहेत.
आज वरिष्ठ अधिकार्यांची बैठक
श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेस परवानगी देण्याच्या अनुषंगाने बुधवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत यात्रा साजरी करण्यासंदर्भात निर्णय होणार आहे.
नियम व अटी घालून यात्रेस परवानगी देण्याबाबत विभागीय आयुक्त सकारात्मक आहेत. किती लोकांना परवानगी मिळणार व यात्रा कशी साजरी करायची, याबाबत आज निर्णय होईल.- राजशेखर हिरेहब्बू,
प्रमुख मानकरी, सिद्धेश्वर यात्रा
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज