टीम मंगळवेढा टाईम्स ।
राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. मात्र पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी येथे बंडाचे निशाण फडकावले असून आज बैलगाडीतून वाजत गाजत येत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.शैला गोडसे या गेल्या विधानसभा निवडणुकीपासून उमेदवारी मागत होत्या मात्र, गेल्यावेळीही त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती.
आता पोटनिवडणुकी रणधुमाळी सुरू असतानाच त्यांनी बंड पुकारत राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढवली आहे.शैला यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत बंडाचे पहिले पाऊल टाकले आहे.
शैला गोडसे या सोलापूर जिल्हा परिषद सदस्य असून वाडीवस्त्यांपर्यंत त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. जनतेसाठी वारंवार आंदोलने करणाऱ्या शैला गोडसे या महिला वर्गात विशेष लोकप्रिय असून जनतेच्या रेट्यामुळेच आपण उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे येथे निडणूक अटीतटीची होणार असल्याचे बोलले जात आहे. उमेदावारी अर्ज दाखल केल्यानंतर जनतेची उमेदवारी म्हणून मी अर्ज भरला असल्याचे गोडसे यांनी सांगितले.
तसेच, बंडखोरी करुन अर्ज भरल्यामुळे शिवसेना पक्षाने कारवाई केली तरी आपण उमेदवारीवर ठाम असल्याचेही गोडसे म्हणाल्या. गोडसे यांच्या या भूमिकेमुळे आता पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक चांगलीच चुरशीची होणार असल्याचे बोलले जात आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज