टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-पंढरपूर विधानसभेच्या अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांच्या प्रचाराचा आज शनिवारी सायंकाळी 5 वाजता रांझणी येथील शंभू महादेव मंदिरात प्रचाराचा नारळ वाढवून शुभारंभ करण्यात येणार आहे.
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. एकच जागा असल्याने संधी मिळणे अशक्य होते, तरीही शैला गोडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
जनतेच्या आग्रहास्तव निवडणूक लढण्यावर मी ठाम आहे असे पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी अपक्ष अर्ज दाखल केलेल्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या सोलापूर जिल्ह्याच्या माजी संघटक शैला गोडसे यांनी बोलताना सांगितले.
अपक्ष उमेदवार गोडसे म्हणाल्या, “पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी; म्हणून गेल्या दोन वर्षांपासून मतदारसंघातील प्रश्न हाताळत होते.
त्यामुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती.
परंतु भाजप आणि शिवसेनेच्या युतीत ही जागा भाजपकडे गेली आणि भाजपने रयत क्रांती पक्षाला सोडल्यामुळे दाखल केलेला अर्ज माघारी घ्यावा लागला.
तरीही मंगळवेढा उपसा सिंचन योजना व भोसे प्रादेशिक पाणी योजना सुरू करण्यासाठी पत्रव्यवहाराच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला. याशिवाय उजनी व भाटघर धरणाच्या कालव्यातील पाण्यासाठीही संघर्ष सुरू होता.
अशा परिस्थितीत पोटनिवडणुकीत पक्षाकडे उमेदवारी मिळावी; म्हणून मागणी केली होती. परंतु या मागणीबद्दल कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.
पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातील जनता माझ्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. त्यांनी ताई, तुम्ही अर्ज भरा असा आग्रह केल्यामुळे मी अर्ज भरला आणि अर्ज भरल्यानंतर मला अर्ज माघार घ्या अशी सूचना शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात आली. परंतु मी ही निवडणूक मतदार संघातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी लढण्याचा निर्णय घेतला होता त्यासाठी जनतेकडून मला सातत्याने पाठबळ मिळत गेले.
मी मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर या तीन तालुक्यांमध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला आहे, जे प्रश्न आमदार, खासदार यांच्या पातळीवरच्या आहेत, ते सोडण्यासाठी त्या पातळीवरच जावे लागते; म्हणून मी पहिल्यांदा जनतेच्या आग्रहास्तव विधानसभा लढविण्याचा प्रयत्न करत आहे, असे शैला गोडसे यांनी नमूद केले.
त्या म्हणाल्या की माझा हा लढा या भागातील सर्वसामान्य, गोरगरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी आहे. समोर उभे असलेले उमेदवार हे घराणेशाही लाभलेले आहेत. शिवाय साखर कारखानदार असल्यामुळे त्यांच्यावर ऊस उत्पादकांची नाराजी आहे.
मी एक सर्वसामान्य कुटुंबातील महिला म्हणून या मतदारसंघातील जनतेसमोर जात आहे आणि जनतेचा कौल विचारात घेता त्यांच्याच आग्रहास्तव मी माझा उमेदवारी अर्ज कायम ठेवण्यावर ठाम आहे. येत्या 4 एप्रिल रोजी मतदारसंघातील जनतेसमोर मी माझा जाहीरनामा ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान प्रचार शुभारंभा प्रसंगी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज