टीम मंगळवेढा टाईम्स ।
साखर आयुक्तालयाने थकीत एफआरपीप्रश्नी कारवाईची तीव्रता वाढविली असून सुमारे १२६ कोटी ७८ लाख रुपये थकीत ठेवल्याप्रकरणी आणखी चार साखर कारखान्यांवर महसुली वसुली प्रमाणपत्रानुसार (आरआरसी) जप्तीच्या कारवाईचे आदेश जारी केले.
थकीत एफआरपी प्रश्नी जप्तीच्या कारवाईचे आदेश झालेल्या कारखान्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढामधील संत दामाजी सहकारी ४५.९६ कोटी, भीमा टाकळी सहकारी २८.४५ कोटी, सातारा जिल्ह्यातील किसनवीर सहकारी ४.९० कोटी आणि बीडमधील जय भवानी सहकारीकडे ४७.४७ कोटी मिळून एकूण १२६.७८ कोटी रुपयांचा समावेश आहे.
ऊस (नियंत्रण) आदेश १९६६ अन्वये हंगाम २०२०-२१ मधील गाळप केलेल्या उसाची थकीत एफआरपी रक्कम कारखान्यांकडून जमीन महसुलाची थकबाकी समजून कारखान्याने उत्पादित केलेली साखर, मोलॅसिस आणि बगॅस इत्यादी उत्पादनाची विक्री करुन त्यामधून ही रक्कम वसूल करण्यात यावी.
तसेच आवश्यकतेप्रमाणे स्वतःच्या जंगम व स्थावर मालमत्तेच्या दस्ताऐवजामध्ये शासनाच्या नावाची नोंद करावी.सदर मालमत्तेची जप्ती करुन त्याची विहित पध्दतीने विक्री करुन व देयबाकी रक्कमेची खात्री करुन संबंधितांना विलंबित कालावधीसाठी १५ टक्के व्याजासह देण्यासाठी संबंधित जिल्हाधिकार्यांना नियुक्त करण्यात आल्याचे आदेशात नमूद केले आहे.
दरम्यान हंगाम २०२०-२१ आता अखेरच्या टप्प्याकडे झुकलेला आहे. १० मार्च रोजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी एकूण १३ कारखान्यांवर ५५६.७५ कोटी रुपये थकीत एफआरपीप्रश्नी जप्तीची कारवाई केली.
त्यामध्ये चार कारखान्यांवर नव्याने केलेली कारवाई पाहता जप्ती रक्कमेचा एकूण आकडा आता ६८३ कोटी ५३ लाख रुपयांवर पोहोचला आहे.(source-पुढारी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज