टीम मंगळवेढा टाईम्स ।
आषाढी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर व आसपासच्या १० गावांमध्ये १८ जुलैपासून संचारबंदी लागू केली आहे. याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पंढरपूर शहराला जोडणारे प्रमुख मार्ग ठिकठिकाणी सील करण्यात आले आहेत.
वाखरी-पंढरपूर या पालखी मार्गावर असणारी उपनगरे, सोसायट्या यामधून येणा-या मार्गावरही बॅरिकेडिंग करून पोलिसांचा कडक पहारा ठेवण्यात आला आहे. पोलिसांची २४ तास गस्त सुरू आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही आषाढी यात्रा सोहळा प्रातिनिधिक स्वरूपात होत आहे. त्यासाठी मानाच्या १० पालख्या व त्यामध्ये प्रत्येकी ४० वारक-यांव्यतिरिक्त कोणत्याही नागरिक, भाविकांना पंढरपुरात प्रवेश देण्यात आला नाही.
१८ ते २५ जुलै दरम्यान शहरात व आसपासच्या गावांमध्ये संचारबंदी लागू केली आहे. शहरात तब्बल तीन हजारांपेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे.
वाखरी-पंढरपूर या पालखी मार्गावर वाखरी पालखीतळापासून मानाच्या १० पालख्या पायी चालत येणार आहेत. त्यामुळे या मार्गावर होणारी गर्दी लक्षात घेता वाखरीपासून सरगम चौकापर्यंत प्रमुख पालखी मार्गांना जोडणा-या सर्व उपमार्गांना बॅरिकेडिंग करण्यात आले आहे.
शिवाय इतर कोणत्या ठिकाणाहून नागरिक, भाविक प्रमुख मार्गावर येऊ शकतात, अशा ठिकाणांची पाहणी करून त्या ठिकाणी पोलिसांचा पहारा, चौकाचौकांत लोखंडी बॅरिकेडिंग लावून पालख्या चालत असताना भाविक येणार नाहीत, याची दक्षता घेतली जात आहे.
पंढरपूरला जोडणा-या टेंभुर्णी, सोलापूर-तीन रस्ता, मंगळवेढा, सांगोला, कराड रोड, फलटण, सातारा रोड आदी प्रमुख मार्गांवर किमान ५. कि.मी. नाकाबंदी केली आहे. तपासणी करून वाहने सोडली जात आहेत.
यात्रा सोहळ्याच्या दिवशी कोणतीही वाहने आत येणार नाहीत, यासाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात येत आहे. आसपासच्या दहा गावांमध्ये संचारबंदी असून पोलिसांची २४ तास गस्त सुरू आहे.
प्रदक्षिणा मार्गावरून चंद्रभागा नदीकडे जाणा-या सर्व घाटांवर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. त्याचबरोबर विठ्ठल-रुक्मिणी मंदिराकडे जाणा-या चौफाळा व महाद्वार पोलीस चौकी या ठिकाणीही बॅरिकेडिंग करून नागरिकांना त्या परिसरात ये-जा करण्यास बंदी केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज