टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील पौट येथील सरपंच राजाराम निमगिरे हे पदाचा गैरवापर करून ओढ्यातील वाळूचा बेकायदा उपसा करतात . कारवाईवेळी महसूल अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्यांनी केली होती . त्याची दखल घेत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी त्यांना अपात्र ठरवले.
उपसरपंच सद्दाम मुल्ला, सुवर्णा हिप्परकर, हरिदास हिप्परकर, श्रद्धा भोरकडे, जयाबाई निमगिरे या ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच निमगिरे यांच्याविरुद्ध विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले होते.
सरपंच निमगिरे यांनी बेकायदा गायरानातील २०० व स्वतःच्या जमिनीतील ३४० असे ५४० ब्रास मुरुम उत्खनन केले. याप्रकरणी त्यांच्या जमिनीवर ५६ लाख १६ हजारांचा बोजा चढवला होता.
तसेच त्यांनी शासकीय ओढ्यातून २५ मे २०२० रोजी बेकायदा वाळू उपसा केला. तेव्हा कारवाईसाठी गेलेले तत्कालीन मंडल अधिकारी, तलाठी यांना सरपंचासह त्यांच्या दोन मुलांनी मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी सरपंचासह दोन मुलांविरुद्ध येथील पोलिसांत गुन्हा दाखल केला होता तसेच त्यांना अटक झाली होती.
वाळू उपसा प्रकरणी त्यांच्यावर अनेकदा कारवाई झाली. त्याची कागदपत्रे जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करीत त्यांना पदमुक्त करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली होती. त्याची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत चौकशी झाली. त्यानंतर सरपंच निमगिरे यांना म्हणणे मांडण्याची संधी दिली.
राजकीय पुढाऱ्यांच्या दबावातून कारवाई केली. मुरुमाचे उत्खनन केले नाही. तेथे शेततळे केल्याचा खुलासा करत त्यांनी अधिकाऱ्यांनी म्हणणे मांडण्याची संधी न दिल्याचा आरोप केला होता.
त्यांचा खुलासा अमान्य करत आयुक्तांनी पंचवार्षिक निवडणूक २०१७ च्या शिल्लक कालावधीपर्यंत त्यांना सरपंच व सदस्य पदावरून काढून टाकण्याचा आदेश दिला. सरपंचावर कारवाई झाल्याने या निकालाने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. (स्रोत:दिव्यमराठी)
अविश्वास ठराव जिंकला कारवाईत गेले पद
ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच राजाराम निमगिरे यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. ठराव जिंकण्यात सरपंच निमगिरे हे यशस्वी ठरले होते. मात्र , विभागीय आयुक्तांनी केलेल्या कारवाईमुळे त्यांना सरपंचपदावरुन दूर व्हावे लागले आहे. शिवाय सदस्यपदही गमवावे लागले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज