मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सरपंच म्हणून गावात होणाऱ्या प्रत्येक कामात त्यांचे वेगळे कमिशन ठरलेले असते. सरपंचाला कमिशन देणे हा पूर्वापार चालत आलेला अलिखीत नियम आहे. त्यामुळे कमिशन घेणे हा सरपंचाचा हक्कच बनला आहे. वेळप्रसंगी कमिशनसाठी काम अडविणे, ठेकेदारांना वेठीस धरणे असेही प्रकार होतात.
कोणत्या कामात किती कमिशन घेतले कुणीच कुणाला सांगत नाही, हे सर्व गुलदस्त्यात असते.
परंतु आपण अडीच वर्षात किती कमिशन घेतले याचा हिशोबच गावकऱ्यांसमोर मांडण्याचे काम एका महिला सरपंचाने केले आहे. त्यांचे नाव आहे मंगलाताई घोपे.
शेगाव तालुक्यातील जळंब या गावच्या त्या सरपंच असून गावाचा सर्वांगिण विकास साधण्यासह संपूर्ण गाव एकाजागी आणण्याची किमया त्यांनी साधली आहे.
अडीच वर्षाच्या काळात मिळालेल्या २२ लाखांच्या कमिशनचा हिशोब गावकऱ्यांना देणाऱ्या त्या राज्यातील पहिल्या महिलासरपंच ठरल्या आहेत.
सरपंच म्हणजे गावचा प्रथम नागरिक असतो. मात्र विविध कामांच्या माध्यमातून कमिशन घेत लाखोंचा मलिदा जमा करण्याचे पद म्हणजे सरपंच, अशी प्रतिमा गत काही वर्षांत निर्माण केली जात असून त्याच दृष्टीने सरपंचाकडे पाहीले जाते.
त्यातच महिला सरपंच असल्यास संपूर्ण कारभार पतीच्याच हाती असतो आणि महिलाराज नव्हे तर पतीराज निर्माण होते, असेही दिसून येते. परंतु याला जळंब हे गाव अपवाद ठरले आहे.
या गावच्या सरपंचा मंगलाताई घोपे यांनी अडीच वर्षांच्या मिळालेल्या कार्यकाळात गावाचा चेहरा मोहरा बदलून टाकला. निस्वार्थपणे केलेल्या कामामुळे आज गावात विकास कामे स्पष्ट दिसून येत आहेत.
अडीच वर्षांमध्ये जवळपास अडीच कोटींची विकास कामे या सरपंच आणि येथील ग्रामपंचायत सदस्यांच्या हातून झाली. यामधून सरपंचास रीतसर कमिशनही मिळाले. परंतु हा कमिशनचा पैसा स्वतःसाठी न ठेवत त्याचाही गावातील विकासकामांसाठी त्यांनी वापर करुन त्याची वेगळी नोंद ठेवली.
अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी गावात एक मोठा कार्यक्रम घेऊन संपूर्ण गावकऱ्यांसमोर कमिशनचा हिशोब त्यांनी मांडला.
कमिशन म्हणून मिळालेल्या २२ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा हिशेब या सरपंचाने गावकऱ्यांसमोर मांडला. एवढेच नव्हे तर अडीच वर्षांत केलेली विकासकामे, त्याचे इस्टिमेट, मिळालेला निधी झालेला
खर्च आणि कमिशन याचा संपूर्ण गोषवारा एका पुस्तकात नमुद करुन हे पुस्तक गावकऱ्यांसमोर सादर केले, त्यामुळे गावकरीही अवाक झाले. तर या काळामध्ये विकासकामे करण्यासाठी ज्या ज्या लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ गावकरी आणि शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मदत केली त्यांचा सत्कारही यावेळी घेण्यात आला हे विशेष.
★ सरपंचांनी आदर्श घ्यावा
महिला केवळ घराचाच नव्हे तर संपूर्ण गावाचा कारभार निटनेटका सांभाळू शकतात हे महिला सरपंच मंगला घोपे यांनी दाखवून दिले आहे.
सर्वांना सोबत घेत अडीच वर्षांत अडीच कोटी रुपयांची विकासात्मक कामे त्यांनी गावात केली असून घोपे यांनी यातून मिळालेल्या कमिशनचाही गावकऱ्यांना हिशोब दिला आहे. आज प्रत्येक गावात असे सरपंच असणे आवश्यक आहे. इतर गावातील सरपंचांनी हा आदर्श घ्यावा, असे आवाहन माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज