टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यातील ग्रामपंचायीच्या संदर्भात सर्वच घटकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी,
संगणक परिचालक या सर्वानीच १८ ते २० डिसेंबर या कालावधीत काम बंद आंदोलन करणार असल्याची माहिती, सरपंच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील यंत्रणा तीन दिवस ठप्प होणार आहे.ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यास आमदार निधीप्रमाणे ग्रामपंचायत पद सदस्य निधी असावा, ग्रामपंचायत सदस्य भत्ता, सरपंच, उपसरपंचाचे थकीत मानधन अदा करावे, त्यात भरीव वाढ व्हावी,
हे मानधन शंभर टक्के रक्कम शासनानेच द्यावे, विमा संरक्षण द्यावे, विधान परिषदेच्या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकार असावा, शिक्षक पदवीधर यांच्या प्रमाणेच महाराष्ट्राच्या सहा विभागातून सहा सरपंच आमदार असावेत,
मुंबईत सरपंच भवन असावे, वित्त आयोगाचा निधी छोट्या ग्रामपंचायतींना दरवर्षी किमान दहा लाख रुपये असावा आदी मागण्यासाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पद एकत्र करून पंचायत विकास अधिकारी पद निर्माण करावे. ग्रामसेवक संघटनेला विधान परिषदेत प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी ग्रामसेवक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष तात्यासाहेब पाटील यांनी केली.
संगणक परिचालकांच्या वेतनात वाढ करावी, नव्याने लादलेली चुकीची टार्गेट सिस्टिम रद्द करावी तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यात अभय यावलकर समितीच्या शिफारसी स्वीकारून नगरपंचायत कर्मचाऱ्याप्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, अशी मागणी संगणक परिचालक संघटनेची आहे.
पत्रकार परिषदेस ग्रामसेवक संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष तात्यासाहेब गोडगे, ग्रामसेवक संघ माढा तालुकाध्यक्ष लक्ष्मण गळगुंडे, संगणक परिचालक संघटनेचे होनमाने, ग्राम रोजगार सेवक संघटनेचे सचिन सरवदे, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत जिल्हा परिषद कामगार युनियनचे दत्ता जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज