टीम मंगळवेढा टाईम्स।
अज्ञात कारणावरून पाच ते सहा अनोळखी व्यक्तींनी जिवे ठार उद्देशाने कंटेनरचालकाचे अपहरण करून त्याच्या डोक्यात मारहाण करून खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या इराद्याने अपघात झाल्याचा बनाव करून त्यास दगडामध्ये टाकून पसार झाले.
ही घटना सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास उदनवाडी ते चोपडी (ता.सांगोला ) रोडलगत भारत वलेकर यांच्या शेताजवळ उघडकीस आली.
संजय भगवान चव्हाण (वय.३०,रा.महमदाबाद – हुन्नूर, ता.मंगळवेढा) असे मृताचे नाव आहे. याबाबत भगवान बाबू चव्हाण (रा.महमदाबाद-हुन्नूर,ता.मंगळवेढा) यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी अज्ञात पाच ते सहाजणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक सुहास जगताप, सहायक पोलीस निरीक्षक हेमंतकुमार काटकर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला.
ममदाबाद-हुन्नूर येथील भगवान बाबू चव्हाण यांचा मुलगा संजय चव्हाण हा सोनंद (ता . सांगोला) येथील सुनील शेठ यांच्या कंटेनरवर चालक म्हणून कामास आहे.
दि.७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० च्या सुमारास भगवान चव्हाण यांनी मुलगा संजयच्या मोबाईलवर फोन लावला असता तो ओळखीचे सुरेश माने यांनी उचलला. त्यांना संजय कोठे आहे , असे विचारल्यावर त्याने ६ फेब्रुवारी रोजी नेज (ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर) येथून अज्ञात अनोळखी पाच ते सहा जणांनी संजय यास अज्ञात कारणावरून मारहाण करून त्याच्या दुचाकीवर बसवून घेऊन गेले आहेत , असे सांगितले.
त्यानंतर सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास महमदाबादचे पोलीस पाटील राजू कटरे यांनी भगवान चव्हाण यांना फोन करून संजयचा सांगोला हद्दीमध्ये उदनवाडी ते चोपडी जाणाऱ्या रोडवर भारत वलेकर यांच्या शेताजवळ अपघात झाल्याचे सांगितले.
त्यानंतर ते चारचाकी वाहनातून तेथे गेले असता मुलगा संजय हा दगडामध्ये मृतावस्थेत पडला होता, तर त्याच्या डोक्यात जखमा, चेहरा रक्ताने माखलेला होता.
त्याच्या जवळच त्याची एमएच १३ / डीएल ६६०४ दुचाकी पडलेली होती. झापाचीवाडीचे पोलीस पाटील मंगेश जवंजाळ यांनी या घटनेची माहिती सांगोला पोलीस स्टेशनला दिली.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर खुनाचा प्रकार उघडकीस आला.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज