टीम मंगळवेढा टाईम्स।
जालन्यातील अंतरवली येथे पोलिसांकडून मराठा आरक्षण आंदोलकांवर लाठीमार झाल्यानंतर आंदोलन चिघळल्याची माहिती हाती आली आहे. या घटनेत आंदोलनकर्ते जखमी झाले आहेत.
तसेच ८ पोलिसही जखमी झाल्याची माहिती आहे. लाठीचार्जनंतर जालन्यात जाळपोळीचीही घटना घडली. या घटनेचे आता राज्यभरात पडसाद उमटताना दिसत आहे.
मंगळवेढ्यात उद्या सरकारचा निषेध
या घटनेच्या निषेधार्थ उद्या मंगळवेढयामधील दामाजी चौकात सकाळी 10.30 वाजता सरकारचा निषेध नोंदवला जाणार असल्याची माहिती खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिध्देश्वर आवताडे यांनी दिली आहे.
जालन्यातील मराठा आरक्षण आंदोनल पेटलं आहे. पोलिसांनी आंदोलकांवर मारहाण केल्यानंतर जालन्यातील अंतरवलीमध्ये आंदोलकांनी बस पेटवल्याची माहिती आहे. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवरही दगडफेक केल्याचीही माहिती आहे.
त्यानंतर आज आंदोलकांनी पोलिसांवर आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, जालन्यातील लाठीचार्जच्या घटनेच्या निषेधार्थ उद्या मराठी क्रांती मोर्चाकडून नाशिक, बीड, नंदुरबार, पंढरपूर येथे निर्दशने येणार आहेत.
नाशिकमध्ये उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे नाशिकचे समन्वयक आणि स्वराज्य पक्षाचे राज्य संपर्कप्रमुख करण गायकर यांनी माहिती दिली आहे. तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उद्या बीड बंदची हाक दिली आहे.
नंदूरबार जिल्ह्यात बंदची हाक
मराठा आरक्षण आणि आज जालना येथे मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन चिरडल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाने नंदूरबार जिल्हा बंदची हाक दिली आहे. उद्या मराठा क्रांती मोर्चातर्फे राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात येणार असल्याची हाक मराठा क्रांती मोर्चाचे नंदूरबार जिल्हाध्यक्ष नितीन जगताप यांनी दिली आहे.
दरम्यान, जालन्यातील घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. मुख्यमंंत्री शिंदे म्हणाले, ‘जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे.
जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून या घटनेची माहिती घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत, जनतेने शांतता राखावी’
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज