टीम मंगळवेढा टाईम्स।
ठाकरे सरकार व महाविकास आघाडीतील बेबनाव वारंवार समोर येत आहे. एकीकडे विरोधी पक्ष सातत्याने निशाणा साधत असताना महाविकास आघाडीतील घटक पक्षातील कुरबुरही वाढताना दिसत आहे.
यातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी महाविकास आघाडीवर निशाणा साधताना दिसत आहेत.
शेतकरी प्रश्नांवर आक्रमक झालेले राजू शेट्टी आता महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
राज्यातील शेतकरी बांधवांच्या प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. त्यामुळे राजू शेट्टी महविकास आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दि.५ एप्रिल रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत अंतिम निर्णय घेण्याचे सूतोवाच देण्यात आले आहेत.
दरम्यान, विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या यादीत आमदार व्हायचे की नाही, याचाही निर्णय याच बैठकीत होणार असल्याचे सांगितले जात आहे.
स्वाभिमानीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता
शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, खासगी कंपन्यांकडून सरकार वीज खरेदी करत नाही. दिवसा वीज द्यावी ही पक्षाची मागणी असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.
महाविकास आघाडीला पाठींबा द्यायचा की नाही याबाबतचा निर्णय ५ एप्रिल रोजी घेणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली. स्वाभिमानी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्य बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.
राज्यात भविष्यात आघाडीचे राजकारण करायचे की नाही, याचादेखील गंभीर विचार या बैठकीत करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. एबीपी माझाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
दरम्यान, अलीकडेच दिल्लीत देशातील सर्वच शेतकरी संघटना बैठक झाली. शेतकऱ्यांना हमी भाव देणारा कायदा करुन घेण्यासाठी आता पुढचा लढा असल्याचे राजू शेट्टींनी सांगितले.
हरभरा हमी भावपेक्षा कमी दरानं खरेदी केला जात आहे. ऊस तोडणी मजूर पेटवून ऊस तोडत आहेत. हे बरोबर नाही. हमी भावाच्या संदर्भात ०१ मे रोजी गावसभेत ठराव घेणार असल्याचे ते म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारमध्ये जाण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निर्णय सामुदायिक होता. अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारला समीक्षा करण्याची वेळ आली आहे.
ज्या उद्देशाने किमान समान कार्यक्रमावर महाविकास आघाडी तयार झाली, त्याचे काय झाले? अनेक मुद्दे खटकणारे आहेत. नवीन धोरण राबवताना संवादही साधला नाही, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.(स्रोत:लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज