टीम मंगळवेढा टाईम्स ।
कृत्रिम दूध तयार करून त्याची खऱ्या दुधात भेसळ करून विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार मंगळवेढा तालुक्यात उघडकीस आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथील धनाजी रामचंद्र गावकरे यांच्या मालकिच्या बसवेश्वर दूध संकलन केंद्रावर छापा टाकून ही कारवाई केली.
या केंद्रांचा परवाना रद्द करण्यात आला असून, त्यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तेथे तयार करण्यात आलेले ७९६ लिटर दूध अधिकाऱ्यांनी जप्त करून नष्ट केले. भेसळयुक्त दुधाची गुणवत्ता वाढविण्यासाठी त्यात व्हे प्रोटीन पावडर मिसळण्यात येत असल्याचे आढळून आले.
दूध भेसळीच्या संदर्भात गुप्त माहितीवरून बोराळे (ता.मंगळवेढा) येथील धनाजी रामचंद्र गावकरे यांच्या मालकिच्या मे.बसवेश्वर दूध संकलन केंद्र या पेढीवर धाड टाकून तपासणी करण्यात आली.
सदर तपासणी दरम्यान पेढीमध्ये व्हे पावडरचा १ बॅग आढळून आले त्यानंतर सदर पेढी मालकाच्या घराची तपासणी केली असता त्याठिकाणी एका खोलीमध्ये व्हे पावडर (अपमिश्रक) अमूल ब्रॅण्ड चे २५ kg चे ४ बॅग आढळून आल्या.
सदर व्हे पावडर बाबत हजर व्यक्तीकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदर पावडर दुधात भेसळ करून फॅट/ SNF वाढविण्यासाठी वापरत असल्याचे सांगितले. यावरुन सदर पेढीमार्फत भेसळयुक्त दुधाची विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर सदर ठिकाणाहून गाय दुध या अन्न पदार्थाचे तसेच व्हे पावडर या अपमिश्रकाचे नमुने विश्लेषणास घेऊन उर्वरित.गाय दूध ७९६ ली.- किंमत २२ हजार २८८व्हे पावडर- (अपमिश्रक) १११ kg किंमत-११ हजार १०० असे एकूण – ३३ हजार ३८८ चा साठा जप्त करून ताब्यात घेतला.
जप्त करण्यात आलेले भेसळयुक्त गाय दूधाचा सुमारे ७९६ लिटरचा साठा नष्ट करण्यात आला. त्यानंतर सदर पेढीस तात्काळ व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सदरची कारवाई प्रदिपकुमार राऊत, सहाय्यक आयुक्त (अन्न ), सोलापूर यांच्या मार्गदर्शन खाली अन्न व औषध प्रशासनातील अन्न सुरक्षा अधिकारी, प्रशांत कुचेकर, उमेश भुसे यांच्या पथकाने पार पाडली.(स्रोत:लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज