टीम मंगळवेढा टाईम्स ।
संत दामाजी सहकारी साखर कारखाना निवडणुकीत आवताडे गट विरुद्ध भालके गट अशी लढत होत असली तरी या कारखाना निवडणुकीचे नेतृत्व हे रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा करतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
श्री.विठ्ठल सहकारी साखर नवडणुकी कारखान्याच्या चेअरमन भगीरथ भालके हे संपूर्णपणे आपली यंत्रणा राबवित असल्याने त्यांना मंगळवेढा येथील संत दामाजी सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी वेळ देता येणार नाही.
हे लक्षात घेवूनच विरोधी आघाडीकडून राहुल शहा यांनी नेतृत्व करावे म्हणून गळ घातली जात असल्याचे चित्र आहे.
भाजपाचे आमदार समाधान आवताडे यांच्या विरूद्ध भालके शहा गट, बबनराव आवताडे गट, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच भाजपाचे माजी पदाधिकारी एकत्र आले असून तुल्यबळ असे पॅनल रिंगणात उतरवण्याचा विरोधी आघाडीचा प्रयत्न आहे.
सर्वांनी आपले हेवेदावे बाजूला ठेवून पॅनल कसे मजबूत करता येईल यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन विरोधी आघाडीकडून केले जात आहे.
विविध गटातील उमेदवाराची चाचपणी सुरू झाली असून हमखास निवडून येण्याची खात्री असणाऱ्या उमेदवारालाच विरोधी आघाडी प्राधान्य देणार आहे.
इकडून तिकडे उडया मारणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून प्रामाणिकपणे पार्टीचे काम करणाऱ्या उमेदवाराचा विचार केला जाईल अशीही चर्चा आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत भगिरथ भालके यांचा पराभव झाल्यानंतर त्यांचे समर्थक पराभवाची कारणे शोधत असून यावेळेस पराभवाची हॅट्रीक कोणत्याही परिस्थितीत होवू द्यायची नाही असा चंग भालके समर्थकांनी पंढरपूरात बांधला आहे.
पंढरपूरच्या विठ्ठल सोबत मंगळवेढयाचा दामाजीही कसा ताब्यात घेता येईल यासाठी वरिष्ठ पातळीवरून व्यूहरचना आखली जात असून कोणत्याही परिस्थितीत आमदार समाधान आवताडे यांचे पॅनेल सत्तेत येवू द्यायचे नाही,
या दृष्टीने नेते मंडळींच्या गुप्त भेटीगाठी सुरू झाल्या असून याकामी त्यांना त्यांचे नेते, पक्षाचे प्रमुख व काही मोठे अर्थकारणी यांचीही साथ या निवडणुकीत लाभणार असल्याची चर्चा सभासदातून सुरू झाली आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत राहुल शहा यांनी स्व.आमदार भारत भालके यांच्या विरोधात भुमिका घेवून स्व.सुधाकरपंत परिचारक यांचा प्रचार केलेला होता.
तर आमदार भारत भालकेंच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत ते थोडेसे भगीरथ भालकेंसाठी सक्रिय झाले होते.
राहुल शहा यांचा पिंड हा मुळचा राष्ट्रवादीचा असल्याने ते राष्ट्रवादीपासून दूर जावू नयेत म्हणून पक्षाचे नेते त्यांना या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय प्रवाहात आणून सक्रिय करत असल्याचीही जोरदार सुरू झाली आहे .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज