टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील मुख्य असणाऱ्या दामाजी चौकात वाहनांची वर्दळ वाढली असून सोमवारी सायंकाळच्या सुमारास सुमारे अर्धा कि.मी. वाहनांची रांग लागल्याने सायंकाळी ७.०० ते ८.०० या वेळेत या चौकात अक्षरशः पुणे, मुंबईतील ट्रॅफिक जाम झाल्यासारखीच परिस्थिती दिसून आली.
सोमवारी सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसास सुरुवात झाली. ७.०० च्या सुमारास पाऊस थांबल्यानंतर अनेक नागरिक आपल्या कामानिमित्त घराबाहेर पडले.
परंतू दामाजी चौकात आल्यानंतर त्यांना जात असताना खुप मोठया वाहनांच्या गर्दीचा सामना करावा लागला. व गर्दीतून मार्ग काढताना मनःस्ताप झाला.
सध्या या परिसरात गटारीच्या कामासाठी चारी काढण्याचे काम सुरु असून रस्ता खूपच अरूंद झाला आहे. शहरातील हा मुख्य चौक असल्याने या रस्त्यावर नेहमी नागरिकांची वर्दळ असते.
शेजारीच एस. टी. स्टँड असल्याने सतत बस ची ये जा सुरु असते. त्यातच कर्नाटकाकडे जाणारी वाहने व कर्नाटकातून येणारी वाहने हेही याच रस्त्यावरून जात होती.
कोटयावधी रुपये खर्चून शासनाने बाह्य वळण रस्ता केला असला तरी तो कुचकामी ठरू लागला आहे. वारंवार सुचना देवून कारवाया करूनही अवजड वाहनांची वाहतुक ही याच रस्त्यावरून होत असून रस्ता छोटा असल्याने या ठिकाणी अनेक मोठी वाहने रस्त्यातच अडकून पडलेली दिसत होती.
मात्र छोटी वाहने व दुचाकीस्वारांना या रस्त्यातून वाहन बाहेर काढताना दमछाक झाली. सुमारे तासभर या परिसरात ट्रॅफिक जाम झाल्याने सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत असल्याचे दिसून आले.
दरम्यान, ऊस वाहतूक करणारी वाहने व अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ व सजग नागरिक संघाने पुढाकार घेण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज