टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाच्या अनुषंगाने लॉकडाऊन काळात प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात असताना जमाव जमवून मास्क न घालता सोशल डिस्टंसिंगचे पालन न केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, विश्व वारकरी सेनेचे अरुण महाराज बुरघाटे यांच्यासह अन्य लोकांवर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुले करावे. या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी व विश्व वारकरी सेना, बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने पंढरपुरात आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रकाश आंबेडकर, अरुण महाराज बुरघाटे, गणेश महाराज शेटे, धनंजय वंजारी, आशोक सोनोने, रेखा ठाकूर, तुकाराम महाराज भोसले, आनंद चंदनशिवे, सागर गायकवाड, रवी सर्वगोड, माऊली हळनवार यांच्यासह अन्य ११ ते १२ लोकांनी सोशल डिस्टंसिंग चे पालन न केल्याप्रकरणी त्यांच्यावर पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याची दखल घेऊन संचारबंदी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथीचे रोग प्रतिबंध अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन करुन ठिय्या आंदोलनासाठी एकत्र जमा होऊन मोठ्याने घोषणाबाजी केल्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी पोलिस हेडकॉन्सेटबल परशुराम माने यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून सहायक पोलिस निरीक्षक श्री.गायकवाड तपास करीत आहेत.
मंदिरं खुली होणार, आठ दिवसात नियमावली, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन’ : प्रकाश आंबेडकर
मंदिरं खुली करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि विश्व वारकरी सेवेच्या वतीने काल पंढरपुरात आंदोलन करण्यात आलं. आंबेडकर आणि शिष्टमंडळाने दरवाज्यातून विठ्ठल-रुक्मिणीचं मुखदर्शन घेतलं. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, लवकरात लवकर लोकांसाठी मंदिर, मशीद, बुद्ध विहार, जैन मंदिर सुरु केली जातील. त्यासाठी सरकार नियमावली तयार केली जात आहे, अशी माहिती मला मुख्यमंत्र्यांकडून मिळाली.
आठ ते दहा दिवसात ही नियमावली तयार होईल आणि मंदिरं सुरु होतील. मंदिरं खुली करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी चांगला निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. आपण आठ दिवस थांबू, वारकऱ्यांच्या आंदोलनाला यश आलं असं आपण समजूया.
आंदोलना दरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
विठ्ठल मंदिर परिसरात काल सकाळी वंचितच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. तसेच या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळालं. यावर विचारलं असता प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्ही फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे,
मात्र कार्यकर्ते ऐकायला तयार नाहीत. यावेळी आंबेडकर यांनी एकमेकांमध्ये अंतर ठेवण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं. बॅरिकेट्स तोडू नका. प्रशासनाला सहकार्य करा, एकमेकांना चिटकून उभे राहू नका, असं आंबेडकर म्हणाले. यावेळी वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी पोलिसांचं बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला.
A case has been registered against Prakash Ambedkar at Pandharpur city police station for agitating for opening of Vitthal temple
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज