टीम मंगळवेढा टाईम्स ।
दहावीतील विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या खासगी क्लासेसचा चालक आणि शिक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
एका मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून छावणी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला असल्याची माहिती निरीक्षक शरद इंगळे यांनी दिली.
अमोल रावसाहेब गवळी (वय ३३, रा. पडेगाव) असे या शिक्षकाचे नाव आहे.दहावीत शिक्षण घेत असलेल्या एका १५ वर्षीय विद्यार्थिनीच्या माजी सैनिक पित्याने दामिनी पथकास फोन करून मुलीची क्लासचालक छेड काढत असल्याचे सांगितले.
दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक सुवर्णा उमाप, हवालदार आशा गायकवाड, निर्मला निंभोरे, लता जाधव आणि चालक गिरीजा आंधळे यांच्या पथकाने पडेगाव गाठले.
आधी त्यांनी छेड काढण्यात येत असलेल्या मुलीच्या कुटुंबाची भेट घेतली. तेव्हा क्लासचा चालक असलेला शिक्षक अमोल गवळी हा मुलींच्या अंगाला सतत हात लावणे, अश्लील बोलणे, भौतिकशास्त्र शिकवताना त्यातील अश्लीलता सांगणे,
तुम्ही माझ्यासोबत संबंध ठेवल्यास काही होत नाही, असे सतत बोलत असल्याची आपबिती मुलीने सांगितली. मोबाइलवर अश्लील मेसेजही त्याने पाठविल्याचे मुलीने दाखवले.
त्यानंतर उपनिरीक्षक उमाप व आंधळे या साध्या वेशात गवळीच्या क्लासमध्ये गेल्या. ‘सर, तुम्ही फिजिक्स विषय खूप चांगला शिकवता.
आमच्या मुलींनाही शिकवणी लावायची आहे’ असे त्यास सांगितले. त्याच्याकडून क्लासची पूर्ण माहिती घेतल्यानंतर त्यांनी आपले खरे रूप दाखविले.
छावणी पोलिसांची गाडी बोलावून घेत गवळी यास ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. तेथे मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली.
त्यानंतर सहायक निरीक्षक मनीषा हिवराळे यांनी मुलीचा जबाब नोंदवला. गवळी याच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत विनयभंगासह इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास निरीक्षक शरद इंगळे करीत आहेत.
तक्रारीसाठी मुली पुढे येईनात
दामिनी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार विवाहित असलेल्या या शिक्षकाने क्लासमधील इतर मुलींचीही छेड काढली होती.
मात्र मुलींनी भीतीपोटी त्याची माहिती पालकांना दिली नाही. एकाच मुलीने शिक्षकाच्या कृत्याची माहिती पालकांना दिली. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यामुळे पोलिसांनी आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज