मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना विषाणूच्या धर्तीवर दुकाने शटरडाऊनचा आदेश देवूनही दुकाने सुरुच ठेवल्याने मंगळवेढयातील एका मॉलचा चालक व चार दुकानदार असे मिळून एकूण पाच जणांविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सध्या कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव मोठया प्रमाणात होत असून लोकांची गर्दी होवू नये म्हणून अत्यावश्यक सेवा वगळता पानटपरी,चहा कँटीन, हॉटेल,ढाबे व इतर दुकाने बंद करण्याचा आदेश दिला होता.१९ मार्च रोजी मंगळवेढयाचे पोलिस शहरातून गस्त घालत असताना पंढरपूर रोडवरील एस डी मार्ट हे मॉल चालू ठेवून विक्री करीत असताना आढळून आले.तसेच मार्केट यार्डमधील गाळयाजवळ एका दुकानामध्ये तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस ठेवल्याचेही आढळून आले.त्याचबरोबर पंढरपूर रोडवर पाण्याच्या कॅनॉलला लागून असणाऱ्या दत्त हॉटेलजवळील दुकानातही एकजण तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी दुकान उघडे ठेवून बसला होता.
मंगळवेढा ते सांगोला रोडवर मोहिते पाटील कॉलेजजवळील एका पानटपरीमध्येही तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.तसेच नागणेवाडीमधील श्रीजल पाण्याच्या प्लँटशेजारी एका पानटपरीत तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यासाठी ठेवल्याचे दिसून आल्याने पो.ना. राजकुमार ढोबळे व विकास क्षीरसागर यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी मॉल चालक शुभम सुरेश जाधव (वय २५,रा.उत्तर कसबा सोलापूर सध्या रा.मंगळवेढा), तुकाराम लक्ष्मण शिंदे (वय ६५ रा.वडर गल्ली), दादासाहेब सुखदेव दबडे (वय २२ रा.नागणेवाडी) , रामचंद्र महादेव पवार (वय ७९ रा.कारखाना रोड) , प्रकाश सोपान मुढे (वय ५२ रा.त्रिमुर्ती नगर, मंगळवेढा) या पाचजणांविरूध्द भा.दं.वि.स. कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील यांच्या आदेशाने व पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राऊत,चालक हवालदार मनोज कुंभार,पो.ना.विकास क्षीरसागर,राजकुमार ढोबळे, पो.कॉ.अनिल दाते आदीनी केले.
जाहिरात :
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज