टीम मंगळवेढा टाईम्स।
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या ‘पांडुरंग परिवारा’कडूनही पंढरपूर तालुक्यात सध्या बैठका घेतल्या जात आहेत.
या बैठका म्हणजे विधानसभा निवडणुकीची तयारी की विधान परिषदेच्या आमदारकीसाठी चाललेले पक्षीय पातळीवरील दबावतंत्राचा एक भाग आहे, असा सवाल राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ हा सोलापूर लोकसभा मतदारसंघात येतो. या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना सुमारे 40 हजारापेक्षा जास्त मतांचे लीड मिळाले आहे.
वास्तविक, मंगळवेढा-पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, मंगळेवढ्यातील दामाजी कारखाना, पंढरपुरातील परिचारकांचे दोन कारखाने,
कल्याणराव काळे यांचा कारखाना असे रथी महारथी सोबत असतानाही पंढरपूर मंगळवेढ्यातून भाजपच्या ऐवजी काँग्रेसला मताधिक्क्य मिळाले होते. त्यामुळे महायुतीसाठी तो एक धक्का होता.
लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यासाठी परिचारक यांच्या पांडुरंग परिवाराकडून पंढरपूर तालुक्यात बैठका घेतल्या जात आहेत. त्याला आगामी विधानसभा निवडणुकीची किनार आहे.
भाजपचे केंद्रात आणि राज्यात सरकार असून अनेक चांगल्या योजना राबवूनही लोकसभा निवडणुकीत माढा आणि सोलापूरमध्ये भाजपला पराभव का स्वीकारावा लागला, याची कारणे या बैठकांतून जाणून घेतली जात आहेत.
दुसरीकडे, विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पांडुरंग परिवाराची यंत्रणा कार्यरत झाली आहे. या बैठकीत विधानसभा निवडणुकीचीही चर्चा होत आहे.
सध्या महाविकास आघाडीला चांगले वातावरण आहे, त्यामुळे परिचारक यांनी महाविकास आघाडीतून निवडणूक लढवावी, असा आग्रह कार्यकर्त्यांकडून होताना दिसत आहे. मात्र, त्याबाबतचा निर्णय खुद्द माजी आमदार प्रशांत परिचारक हेच घेणार आहेत.
विधान परिषदेची निवडणूकही ही जाहीर झाली आहे. विधान परिषदेसाठी सध्या प्रशांत परिचारक यांच्या नावाची चर्चा सध्या आहे.
विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळूनही यश-अपयशाची चिंता करत बसण्यापेक्षा विधान परिषद पदरात पडून घेण्याचा प्रयत्न माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटाकडून होऊ शकतो. त्यासाठीच सध्या पांडुरंग परिवाराच्या बैठका सुरू आहेत की काय, अशी चर्चा रंगली आहे.(स्रोत: सरकारनामा)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज