मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
दामदुप्पट रक्कम परतावा देण्याचे आमिष दाखवून एका कंपनीने सुमारे एक हजार २०० नागरिकांची एक कोटी 32 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी संबंधित कंपनीच्या चार संचालकांविरुद्ध पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मातृभूमी ग्रुप ऑफ कंपनीचे अंतर्गत येणाऱ्या मातृभूमी रियलटेक डेव्हलपमेंट लिमिटेड पंढरपूर, ता. पंढरपूर या नावाने येथील प्लॉट नंबर 29, ज्ञान कांचन हॉस्पिटल, केबीपी कॉलेज रोड येथे कार्यालय सुरू होते. 1 जानेवारी 2012 पासून कंपनीच्या प्रतिनिधींनी गुंतवणूकदारांना मातृभूमी ग्रुप ऑफ कंपनी अंतर्गत येणाऱ्या मातृभूमी रियलटेक डेव्हलपमेंट लिमिटेड या कंपनीचे नावाने वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली.
आणि त्या योजनेत रक्कम गुंतवणूक केल्यास दामदुप्पट रक्कम परतावा देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादीसह या सर्वांनी मिळून अंदाजे एक कोटी ३२ लाख रुपयांची गुंतवणूक केली. परंतु फिर्यादी आणि संबंधित अन्य लोकांना गुंतवलेल्या ठेवींची लाभासह कोणतेही परतफेड केली नाही.
संगनमत करून फिर्यादी आणि फिर्यादीप्रमाणेच 20 ते 22 प्रतिनिधी व इतर 1100 ते 1200 गुंतवणूकदाराची फसवणूक केली, असल्याची फिर्याद बाळासाहेब कुंडलिक लोखंडे (वय 44 वर्षे, व्यवसाय- शेती, रा. शेंडेचिंच, ता. माळशिरस) यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी प्रदीप रवींद्र गर्ग (रा. रविराज पालम, बी विंग फ्लॅट नंबर 1401, तमिळ चर्च जवळ मिरा रोड, ठाणे पूर्व), संजय हेमंत बिस्वास (संचालक) (रा. यशराज पार्क, एम.10213, कासार वडवली, घोडबंदर रोड, ठाणे पूर्व), मिलिंद आनंद जाधव (संचालक) (रा. रूम नंबर सात, दुसरा मजला शाखेत अपार्टमेंट उदय नगर नक्षत्र सोसायटी जवळ पाच पाखाडी, ठाणे), विनोदभाई वजीरभाई पटेल (संचालक) (रा. नानापोन्डा लुहार, ता. काप्रडा, जि. वलसाड, गुजरात) यांच्या विरोधात वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक करे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज