मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
देशातील धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेले गुरु बिरोबा आणि शिष्य महालिंगराया यांच्या भेटीचा अनोखा सोहळा मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे पार पडला.
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि गोवा या राज्यातून लाखोंच्या संख्येने धनगर बांधव या अनोख्या भेटीसाठी हुलजंती येथे आले होते. या गुरुशिष्यांच्या भेटी दरम्यान हजारो टन भंडारा, खारीक खोबरे आणि लोकराची उधळण झाल्याने अवघा परिसर भंडाऱ्याने न्हाऊन निघाला होता.

दिवाळी लक्ष्मीपूजनादिवशी हा अनोखा सोहळा संपन्न झाला. यावेळी मंगळवेढ्याचे आमदार समाधान ,सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, चेअरमन अनिल सावंत यांच्यासह जिल्ह्यातले अनेक नेते उपस्थित होते.

बाराव्या शतकापासून परंपरा
बाराव्या शतकापासून चालत आलेली ही परंपरा असून दिवाळीच्या पाडव्याच्या पूर्व संध्येला हा अनोख्या भेटीचा सोहळा पार पडतो .

या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी लाखोंच्या संख्येने धनगर समाज वर्षभर वाट पाहत असतो .

बिरोबा व महालिंगराया या गुरू-शिष्यांच्या पालखीचा मुख्य भेटीचा सोहळा मंगळवारी दुपारी संपन्न झाला. अमावास्येला मुंडास बांधले गेले. मध्यान रात्री कैलासमधून शंकर पार्वती येतात अन् महालिंगराया मंदिराच्या पंच शिखराला (मुंडास) आहेर करतात. यावेळी देवाची मूक भाकणूक झाली अशी भाविकांची मान्यता आहे .

त्यानंतर गुरु-शिष्यांच्या पालखी भेटीचा सोहळा देवस्थानच्या बाजूने वाहत असलेल्या दूध ओढ्यात हजारोंच्या उपस्थितीत पार पडला. गुरुशिष्यांची पालखी भेट झाल्यानंतर नगारा व ढोल कैताळ वाजवत इतर पालख्यांनी महालिंगराया पालखीची भेट घेतली . यावेळी ‘महालिंगराया- बिरोबाच्या नावान चांगभलं’च्या गजरात आकाशात भंडारा, लोकर व खोबरे उधळण्यात आले.

नगारा व ढोल यांच्या आवाजाने संपूर्ण परिसर दणाणून गेला . हुलजंतीला हालमत धर्माची काशी मानली जाते. नुकतीच पट्टणकोडोली येथील विठ्ठल बिरुदेवाची यात्रा पार पडली. परंपरेनुसार त्यानंतर हा भेट सोहळा लगेचच पार पाडत असतो.
कोरोनापेक्षा भयंकर महामारी येणार
कोरोनापेक्षा भयंकर महामारी येणार. राजकारणात उलथापालथ होईल, राजकीय नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातील. येत्या पौर्णिमेच्या आसपास व येत्या वर्षात पाऊस चांगला पडेल.
देशी जनावरे महाग होणार, खिलार गाई -बैल प्रचंड महागणार तर शेळ्या मेंढ्यांना चांगले दिवस येणार. बैलांची चांदी होईल मात्र संख्या कमी होणार, असल्याची भाकणूक झाल्याचे महालिंगरायाचे पुजारी मारुती पेटर्गे यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














