टीम मंगळवेढा टाईम्स ।
दिवाळी उत्सवाच्या १४ दिवस शाळांना सुट्या आहेत. या दीर्घ मुदतीच्या सुट्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, माळशिरस, माढा, करमाळा व बार्शी या दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जाणार आहे. शासकीय व अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना हा पोषण आहार दिला जाणार आहे.
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील शासकीय व अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्याथ्यांना पोषण आहाराचा लाभ दिला जातो. पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक व १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त आणि सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ७०० उष्मांक व २० ग्रॅम प्रथिनेयुक्त माध्यान्ह भोजन दिले जाते.
सध्या तांदळापासून तयार केलेल्या पाककृतीच्या स्वरूपात हा आहार मिळतो. दरम्यान, अंड्यातील पौष्टिक मूल्यांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा, यासाठी व अंडी उत्पादक शेतकऱ्यांना राज्यांतर्गत स्थानिक बाजारपेठ मिळावी म्हणून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत पोषण आहारात अंड्याचा समावेश करण्याचा निर्णय मंगळवारी शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
बचत गटाच्या माध्यमातून त्याचा पुरवठा होईल. दरम्यान, प्रत्येक विद्यार्थ्यास प्रत्येक आठवड्यातील बुधवार किंवा शुक्रवारी आहारासोबतच शिजवलेले एक अंडे दिले जाणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९५ शाळा तर ‘माध्यमिक’च्या अनुदानित एक हजार ५४ शाळांमधील आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.
रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी निर्णय
■ अंड्यात उच्च प्रतिचे प्रथिने, उष्मांक, जीवनसत्त्वे, लोह, कॅल्शिअम, कार्बोहायड्रेड असतात. त्यामुळे अंड्याचा आहारात समावेश केल्यास विद्यार्थ्यांची वाढ व रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल, असा विश्वास सरकारला आहे. दुसरीकडे अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना केळी किंवा स्थानिक फळ दिले जाणार आहे. त्याच्या नोंदी ठेवल्या जातील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना दिवाळी सुट्टीतही पोषण आहार दिला जाणार
सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. दुष्काळी निकषांप्रमाणे त्या पाच तालुक्यांमधील शासकीय व अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिवाळी सुट्टीतही पोषण आहार दिला जाणार आहे. दिवाळीनंतर आहारात अंडी व केळी, याची वाढ होणार आहे.- प्रसाद मिरकले, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर
केळी उत्पादक शेतकरी आनंदी
शालेय पोषण आहारामध्ये केळीचा समावेश करण्याच्या शासन निर्णयामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांची अनेक दिवसांपासूनची मागणी मंजूर झाली आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.
केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शासकीय तसेच शासन अनुदानावर चालणान्या शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना देत असलेल्या नियमित पोषण आहारासोबत अतिरिक्त पूरक पोषणमूल्य मिळण्यासाठी वर्षांतील २३ आठवडे अंडी व केळी देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे.
यासाठी वार्षिक अंदाजपत्रकात पाच टक्के निधीची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसापासून केळी उत्पादक शेतकऱ्यांची शालेय पोषण आहारामध्ये केळीचा समावेश करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक संघाने केली होती. (स्रोत:सकाळ)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज